Pawna Dam: पवना धरणातून विसर्गात मोठी वाढ! नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pawna Dam: पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरूच; सकाळी ४,३७० क्युसेक असणारा विसर्ग सायंकाळी थेट ११,२५० क्युसेकवर.

Pawna Dam – पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी सोमवारी दिवसभरात धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात तीन टप्प्यांत वाढ करण्यात आली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत धरणातून ११,२५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. सोमवारी सकाळी धरणातून ४,३७० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी ९ वाजता विसर्ग वाढवून ५,७२० क्युसेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता तो ९,९२० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. दुपारी ४ वाजता आणखी वाढ करून विसर्ग ११,२५० क्युसेक करण्यात आला. धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून होणाऱ्या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाणार आहे.
त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्र, पूल तसेच सखल भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ॲड. भरत ठाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर यांनी धरणाच्या पाणी नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. धरणाचे मजबुतीकरण अद्याप पूर्ण झालेले नसताना ते पूर्ण क्षमतेने भरून ठेवणे धोकादायक ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
पाऊस थांबताच विसर्ग पूर्णपणे बंद करून धरण १०० टक्के भरले जात असल्याने धरणाखालील गावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. १५ ऑगस्टपर्यंत धरणातील पाणीसाठा सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत ठेवून त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पूरस्थितीचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असेही ज्ञानेश्वर ठाकर यांनी सुचविले.





