Nira Basin Dam: शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली! नीरा खोऱ्यातील ४ धरणांत ९२% पाणीसाठा; पाहा काय आहे स्थिती
Nira Basin Dam: भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी धरणांमध्ये एकूण ४४.३२६ टीएमसी (९१.९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा.

Nira Basin Dam – यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे नीरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. (दि.२९) रोजी दुपारी ४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, चारही धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ४८.१९८ टीएमसी असून त्यापैकी ४४.३२६ टीएमसी म्हणजेच ९१.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मागील वर्षी याच दिवशी हा साठा ४४.१२७ टीएमसी (९१.३१ टक्के) इतका होता. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाणीसाठा उपलब्ध असून आगामी काळातील पिण्याचे पाणी व सिंचनासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. भाटघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता २३.५०२ टीएमसी असून सध्या त्यामध्ये २०.६६२ टीएमसी म्हणजे ८७.९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरण क्षेत्रात ५८० मिमी पावसाची नोंद झाली असून, सध्या २३५ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. नीरा देवघर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ११.७२९ टीएमसी असून त्यामध्ये ११.१२६ टीएमसी म्हणजे ९४.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात १,३६२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ११० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. वीज निर्मितीसाठी ७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वीर धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ९.४०८ टीएमसी असून त्यामध्ये ९.३४० टीएमसी म्हणजे ९९.२८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सध्या एकूण ५,७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यामध्ये स्पिलवेमधून ४,६३७ क्युसेक आणि एस्केपमधून १,१०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
नीरा डावा कालव्यातून ८२७ क्युसेक आणि नीरा उजवा कालव्यातून १,५५० क्युसेक पाणी शेतीसाठी सोडण्यात येत आहे. गुंजवणी धरणाची उपयुक्त साठवण क्षमता ३.६९७ टीएमसी असून त्यामध्ये ३.१९८ टीएमसी म्हणजे ८६.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात १,४५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. वीज निर्मितीसाठी २५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा
नीरा खोऱ्यातील धरणांमधील हा पाणीसाठा पुणे, सोलापूर, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि फलटण परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच हजारो हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठी महत्त्वाचा आहे. ऊस, डाळिंब, भाजीपाला, नगदी पिकांसाठी नीरा प्रणालीचे पाणी जीवनदायी मानले जाते. धरणांमधील वाढलेला पाणीसाठा पाहता, आगामी रब्बी हंगामासाठी जलसुरक्षेचा मजबूत पाया तयार झाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.





