PCMC Hospital: स्मार्ट सिटीच्या गप्पा फोल! महापालिकेच्या रुग्णालयात सिस्टीम डाऊन, रुग्णसेवा सलाइनवर
PCMC Hospital: यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयांतर्गत मासुळकर नेत्र रुग्णालयात तांत्रिक गोंधळ; केसपेपर आणि बिलासाठी तासनतास रांगा.

PCMC Hospital – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाअंतर्गत सुरू असलेल्या मासुळकर नेत्र रुग्णालयामध्ये गेल्या सहा दिवसांपासून इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे केसपेपर काढणे, माहिती अपडेट करणे यासह बिल तयार करणे असा असंख्य अडचणींचा सामना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.
त्याचा फटका रुग्णांना बसला असून संगणकीय सेवा बंद पडल्यामुळे उपचार प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची नोंदणी, केस पेपर तयार करणे, विविध शासकीय योजनांमध्ये नोंदणी व लाभ देणे, तसेच रुग्णांची वैद्यकीय माहिती अपडेट करण्याचे काम नियमितपणे केले जाते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संपूर्ण प्रणाली बंद असल्यामुळे रुग्णसेवा अक्षरशः ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना साधा केस पेपरही मिळत नसल्याने त्यांना उपचारासाठी तासनतास रांगेत थांबावे लागत आहे. ऑनलाइन प्रणाली बंद पडल्यामुळे बिलिंग प्रक्रियेवरही मोठा परिणाम झाला आहे. संगणकावरून बिल देणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी हाताने नोंदी ठेवण्याचा पर्याय अवलंबला जात आहे.
मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत आहे. तर काही प्रकरणांमध्ये बिल अद्ययावत होत नसल्याने बिल किती घ्यायचे हे देखील समजत नाही. त्यामुळे आयपीडी अर्थात रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात देखील अडचण येत आहेत. परिणामी, रुग्णालयातील कामकाजात गोंधळ निर्माण झाला असून, डॉक्टर आणि कर्मचारी यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचण
आरोग्य ही अत्यावश्यक सेवा असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. ऑनलाइन सेवा ठप्प होणे ही तांत्रिक अडचण नसून ती व्यवस्थापनात मोठी त्रुटी असल्याची बाब आहे. नियमित बॅकअप प्रणाली, सर्व्हर मेंटेनन्स आणि पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण प्रणाली कोसळल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट सिटीच्या गप्पा फोल
पिंपरी चिंचवड महापालिकेने पेपरलेस कारभार सुरू केला आहे. त्यासाठी ऑनलाइन सेवांना अधिकाधिक प्राधान्य दिले जात आहे. स्मार्ट सिटी होऊ पाहणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या गप्पा मात्र फोल ठरत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयांमधील इंटरनेट सेवा देखील व्यवस्थित देता येत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
इंटरनेट पुरविण्यासाठी मे. तिकोणा या ठेकेदार कंपनीला काम देण्यात आले आहे. त्यांचा आता सध्याचा इंटरनेट वेग २० एमबीपीएस असा आहे. त्यामध्ये वाढ करून संबंधित कंपनी ५० एमबीपीएस असा इंटरनेट वेग देणार आहे. तसेच महापालिकेची सॅप प्रणाली आणि वायसीएम रुग्णालयातील अमृत प्रणाली याच्याशी ही नेट सुविधा लिंक केली जाणार आहे. हे काम शनिवार व रविवार देखील सुरू होते. आज पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. संबंधित ठेकेदाराला याची कल्पना देऊन तातडीने काम पूर्ण करण्यात येईल.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.





