Pavana Dam: पवना धरण ९७% भरले! नदीपात्रात विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
Pavana Dam: पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस! धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन.

Pavana Dam – पवना धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेल्याने धरणातून पवना नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. प्रशासनाकडून सुरू असलेला ७,५५० क्युसेक विसर्ग वाढवून ९,००० क्युसेक करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तो टप्प्याटप्प्याने १२,००० क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागांतर्गत पवना धरण प्रकल्पाने रविवारी (दि. २६) दुपारी २ वाजता याबाबतची माहिती दिली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे. परिणामी धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे पवना नदीसह परिसरातील ओढे व नाल्यांची पाणीपातळी अचानक वाढू शकते.
त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रातील साहित्य, शेतीची अवजारे, कृषी पंप तसेच जनावरे त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. तसेच तालुका, जिल्हा आणि शहर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.





