Newasa News : आषाढी एकादशीनिमित्त नेवासा येथे माऊलींच्या “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन!
आषाढी शुद्ध (देवशयनी) एकादशीच्या पावन पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा (Newasa News) येथे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहिला.

Newasa News : आषाढी शुद्ध (देवशयनी) एकादशीच्या पावन पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा (Newasa News) येथे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहिला.
“ज्ञानोबा-तुकाराम” आणि “माऊली माऊली”च्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. माऊलींचे मूर्तीमंत रूप मानल्या जाणाऱ्या पवित्र ‘पैस’ खांबाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी व भाविकांनी (Newasa News) पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
वेदमंत्रांच्या जयघोषात महाअभिषेक
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे ४ वाजता देवस्थानचे प्रमुख महंत वेदांताचार्य ह.भ.प. देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमंत्रांच्या जयघोषात ‘पैस’ खांबास महाअभिषेक करण्यात आला. याप्रसंगी रामकृष्ण हरी प्रभात फेरीचे मार्गदर्शक अनंता नळकांडे, सविता नळकांडे, विनोद नळकांडे, सुवर्णा नळकांडे आणि सत्वशीला दिगंबर नळकांडे यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
यावेळी संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने (Newasa News) जनसंपर्क अधिकारी माऊली सेवेकरी आशिष कावरे, विष्णू जाधव, गोरख शेळके आणि वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने यजमानांना श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनीही मंदिरात उपस्थित राहून ‘पैस’ खांबाचे दर्शन घेतले.
भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था
पहाटे तीन वाजेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुख्य दर्शन बारीसोबतच प्रवेशद्वारापासून मुखदर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर प्रांगणातील गुरुवर्य बन्सी महाराज समाधी मंदिर व श्री दत्त मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. परिसर व्यापाराने सजल्यामुळे संपूर्ण क्षेत्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
भाविकांना सेवा देण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, विश्वस्त रामभाऊ जगताप, जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे आणि संतसेवक योगेश रासने कार्यरत होते. सायंकाळी पुण्याचे माऊली भक्त अथर्व वडापूरकर व पूजा वडापूरकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
कामिका एकादशी सोहळ्याची तयारी सुरू
येत्या रविवारी, ९ ऑगस्ट रोजी तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका एकादशीनिमित्त मोठी यात्रा (Newasa News) भरणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने देवस्थान प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.





