Pune District : चिमुकल्या गार्गीच्या उपचारांचा मार्ग मोकळा
Pune District : गार्गीला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एसएमए) टाइप-१ हा गंभीर आजार झाला आहे. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तिच्या उपचारांसाठी ‘झोल्गेन्स्मा’ हे महागडे इंजेक्शन आवश्यक असून, त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एवढी मोठी रक्कम उभी करणे जाधव कुटुंबीयांसाठी मोठे आव्हान होते.

वाघोली : दुर्मिळ स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एसएमए) टाइप-१ या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या वाघोलीतील एक वर्षाच्या गार्गी संदीप जाधव हिच्या उपचारांसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. दानशूर नागरिकांच्या सहकार्यामुळे १९ ऑक्टोबर रोजी उपचारांसाठी आवश्यक असलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीचा टप्पा पूर्ण झाला. त्यामुळे गार्गीच्या उपचारांना लवकरच सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली असून, चिमुकलीचे आयुष्य वाचवण्यासाठी एकवटलेल्या हजारो हातांतून माणुसकीचे दर्शन घडले आहे.
गार्गीला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एसएमए) टाइप-१ हा गंभीर आजार झाला आहे. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तिच्या उपचारांसाठी ‘झोल्गेन्स्मा’ हे महागडे इंजेक्शन आवश्यक असून, त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एवढी मोठी रक्कम उभी करणे जाधव कुटुंबीयांसाठी मोठे आव्हान होते. गार्गीच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन कुटुंबीयांनी १ ऑगस्ट रोजी केले. त्यानंतर समाजमाध्यमांवरून मदत मोहीम वेगाने पसरली. विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेत आर्थिक मदत केली. अनेकांनी आपल्या परीने दिलेल्या छोट्या-मोठ्या देणग्यांतून अखेर १९ ऑक्टोबर रोजी १० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यात यश आले.
आवश्यक निधी जमा झाल्याने गार्गीच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होऊन उपचार सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. एका वर्षाच्या चिमुकलीसाठी हजारो नागरिकांनी एकत्र येत केलेली मदत समाजातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी ठरली आहे.
तुमच्या प्रत्येकाच्या लहान-मोठ्या मदतीने, प्रार्थनेने आणि सहकार्याने आम्हाला ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करता आली. या कठीण प्रवासात साथ देणाऱ्या सर्व देणगीदारांचे, हितचिंतकांचे आणि पाठिराख्यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू.
-जाधव कुटुंबीय





