Otur : ओतूर बसस्थानक की खासगी वाहनतळ?
Otur : महामार्गावर वारंवार अपघात होत असताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणार्या खासगी वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना संबंधित वाहनांवर कारवाई का होत नाही आणि त्यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर बसस्थानकाला खासगी प्रवासी वाहनांच्या विळख्याने घेरले असून, बसस्थानकाचे रूपांतर वाहनतळात झाले आहे. दिवसभर बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहने उभी करून त्यातून प्रवासी भरले जात असल्याने एसटी बसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहने धावत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नगर-कल्याण महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने खासगी प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, या वाहनांनी बसस्थानकाच्या आवारातच ठाण मांडल्याने प्रवाशांसह एसटी बसचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर वारंवार अपघात होत असताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणार्या खासगी वाहनांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना संबंधित वाहनांवर कारवाई का होत नाही आणि त्यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी नागरी सुविधांच्या माध्यमातून बसस्थानकातील रस्त्याच्या कामासाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी दोन्ही बाजूंना खासगी वाहने उभी केली जात असल्याने प्रत्यक्ष वाहतुकीसाठी अपुरी जागा उरते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी की वाहनांच्या पार्किंगसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बसस्थानकातील अतिक्रमणे दूर करून खासगी वाहनांवर कारवाई करावी आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवी संस्थांनी दिला आहे.
अद्ययावत बसस्थानकाची मागणी दुर्लक्षित
ओतूर बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने प्रत्यक्ष वापरासाठी अत्यल्प जागा उपलब्ध आहे. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील महत्त्वाचे बसस्थानक असूनही येथे आवश्यक सुविधांचा अभाव जाणवतो. बसस्थानक अद्ययावत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या गैरसोयींचा मोठा फटका बसत आहे.





