Pune District : कनेरसर-पाबळ रस्त्यासाठी ११.४० कोटींची मान्यता
Pune District : कनेरसर-पाबळ रस्त्याची दुरवस्था झाल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आमदार काळे यांच्याकडे केली होती.

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील कनेरसर-पाबळ रस्त्याच्या कामासाठी शासनाने 11 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सहा किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
कनेरसर-पाबळ रस्त्याची दुरवस्था झाल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आमदार काळे यांच्याकडे केली होती. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणारे भाविक या मार्गाचा वापर करू शकतात. त्यामुळे या रस्त्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी आमदार काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
दरम्यान, कनेरसर-पाबळ रस्ता पूर्णपणे उखडला असून, काही दिवसांपूर्वी बुजवलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उघडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कनेरसर आणि पाबळ येथील नागरिकांनी आंदोलने केली होती. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारी 2027 पर्यंत काम पूर्ण होईल, असे आमदार बाबाजी काळे यांनी आश्वस्त केल्याची माहिती कनेरसर ग्रामपंचायत सदस्य उमेश दौंडकर यांनी दिली. या निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश दौंडकर, महेश लोखंडे, संजय दौंडकर, सुमीत हजारे आणि डॉ. भाऊसाहेब फुके यांनी आमदार काळे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.





