Pune District : ‘बीआयए’कडून सामाजिक बांधिलकी अधोरेखित
Pune District : ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन बीआयए, सेंटरचे माजी अध्यक्ष सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला आहे.

पुणे : पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील डॉ. शंकरराव कोलते विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मुलींसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहाचे शाळेकडे हस्तांतरण केले. पुणे स्थित ज्येष्ठ स्थापत्य अभियंता आर. बी. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांमधून वैयक्तिक व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीआयए), सेंटरच्या खर्चातून उभारलेल्या १९ हून अधिक स्वच्छतागृहांचा आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक मुलींना लाभ झाला आहे.
यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. बीआयएकडून सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे. छोटेखानी कार्यक्रमात ग्रामस्थ, मुख्याध्यापक व विद्यार्थिनींनी सुविधेमुळे मोठा लाभ होणार असल्याची भावना व्यक्त केली.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन बीआयए, सेंटरचे माजी अध्यक्ष सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा नसल्याच्या समस्या समोर आली होती. सूर्यवंशी यांनी २०१३ पासून समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला. शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या खर्चातून आणि बीआयए सेंटरच्या सहकार्याने स्वच्छतागृहांच्या उभारणीचे काम सुरू केले.
मुलींसाठी मूलभूत सुविधा आवश्यक- सूर्यवंशी
आर. बी. सूर्यवंशी म्हणाले, मुली साक्षर होण्यातच संपूर्ण समाजाचे हित आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनी हे काम केवळ एक प्रशासकीय औपचारिकता न समजता, एक राष्ट्रीय मोहीम म्हणून हाती घ्यायला हवे. ग्रामीण भागातील मुलींना सुरक्षित, आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी शाळांमध्ये स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सुविधांअभावी विद्यार्थिनींचे शिक्षण थांबू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
साडेतीन हजारांहून अधिक मुलींना लाभ
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-वारजे, भानोबा विद्यालय-कोयाळी, शिवशंभो विद्यालय-एखतपूर, विद्या महामंडळ प्रशाला-कोथळे, मोहोळ माध्यमिक प्रशाला-पाळू, महर्षी वाल्मिकी हायस्कूल-वाल्हे, मातोश्री सोनाबाई रामचंद्र दंडगे विद्यालय-रुळे, श्री. नागेश्वर विद्यालय-आंबावडे, न्यू इंग्लिश स्कूल-गुरोळी, श्री. बाबालाल काकडे देशमुख विद्यालय-पिंपरे खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल-जेऊर, माध्यमिक विद्यालय-गडदरवाडी-खंडोबाची वाडी, न्यू इंग्लिश स्कूल-जावळजुंज, राजुरी माध्यमिक विद्यालय-राजुरी, श्री. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय-अवसरी खुर्द, विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालय-माळेगाव-नसरापूर, वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय-पिंगोरी, सरस्वती विद्यालय-विसापूर, शंकरराव कोलते विद्यालय-पिसर्वे, भोर, खेड, बारामती, शिरूर, वेल्हे, आंबेगाव, पुरंदर, पुणे तालुक्यातील साडेतीन हजारांहून अधिक मुलींसाठी स्वच्छतागृहाची सोय झाली आहे.





