Patan News: शिक्षकांच्या घामाच्या पैशांवर डल्ला? पाटण तालुक्यातील शिक्षक सोसायटीत मोठा घोटाळा?
Patan News: सहकाराच्या तत्त्वांना तिलांजली देत मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी निर्णय? डी.डी.आर. मार्फत तातडीने नि:ष्पक्ष चौकशीची मागणी करत शिक्षक संघटना आक्रमक.

Patan News – पाटण तालुक्यातील शिक्षक सोसायटीचा कारभार सध्या वादाच्या भोवर्यात सापडला असून, सहकाराच्या नावाखाली शिक्षकांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटना आक्रमक झाली असून, आता अन्याय सहन करणार नाही, असा थेट इशारा देत संघर्षाची भूमिका घेतली आहे.
सभासदांच्या संमतीशिवाय आर्थिक कपात केल्याचा मुद्दा उघड होताच शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सहकाराच्या तत्त्वांचा बळी देत काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ही सोसायटी आहे की खासगी मालकीचा कारभार? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची डी.डी.आर.मार्फत तातडीने नि:ष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, संमतीविना कपात केलेली रक्कम तात्काळ परत करावी आणि सभासदांच्या इच्छेविरोधात घेतलेले शाखा विस्ताराचे निर्णय रद्द करावेत, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत संघटनेने सोसायटी प्रशासनाला उघड आव्हान दिले आहे.
त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे आहेत. या संघर्षाला शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत कांबळे, भारत देवकांत, तालुका अध्यक्ष बंडू पवार, आनंद चाळके, तानाजी पवार, राजू पवार, सुधीर जाधव, राजेंद्र बोडके, धनराज अडसूळ, विजय खांडेकर, राहुल खेरमोडे, श्रीरंग चव्हाण, सागर पाटोळे, विजय चाळके, विजय शेलार, उमेश पाटील आदींसह अनेक पदाधिकारी,
माजी पदाधिकारी व सभासदांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हा वाद आता व्यापक आंदोलनाचे रूप धारण करण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वार्षिक सभा रणांगण ठरण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या रोषाला योग्य प्रतिसाद न दिल्यास हा संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता आहे. एकूणच, सहकाराच्या मूल्यांना तिलांजली देणार्या या कथित कारभाराविरोधात शिक्षकांनी उघडपणे बंड पुकारले असून हिशोब द्या, नाहीतर संघर्षाला सामोरे जा, असा स्पष्ट संदेश सोसायटी प्रशासनाला दिला आहे.





