मुंबई: विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी पुकारलेले ‘शाळा बंद’ आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा निर्धार शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे. आंदोलन दाबण्यासाठी शिक्षण विभागाने आंदोलन कर्त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरी देखील राज्यातील शिक्षक संघटनांनी आता माघार घ्यायची नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या शाळा बंद राहणार हे निश्चित झाले आहे. राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सुमारे २५ हजार शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात सहभागी झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. मात्र, या निर्णयामुळे शिक्षक संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. या आहेत मागण्या – टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा येत्या शुक्रवारी (दि. ५) बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे मोर्चा काढला जाणार आहे. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकांनाही सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करावी, शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत, विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी, वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी, आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे, कमी पटाच्या शाळा बंद करू नये आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढल्यानंतरही प्रलंबित मागण्यावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करतील. मुंबई येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.