Passport of India – जागतिक पासपोर्टच्या क्रमवारीमध्ये भारताच्या पासपोर्टची पत ८४ व्या क्रमांकावरून ८५ व्या क्रमांकावर घसरली आहे. मात्र, गेल्या एका वर्षात भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवासाची संख्या ६० वरून ६२ वर गेली आहे.
फ्रेंच पास्पोर्टने १९४ देशांना व्हिसामुक्त प्रवास उपलब्ध करून दिला असल्याने फ्रेंच पासपोर्टला जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. फ्रान्सनंतर जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेनने अव्वल स्थान पटकावले.
देशाच्या पासपोर्टची ताकद ही त्याची सॉफ्ट पॉवर मोजण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निकष मानले जाते. एक मजबूत पासपोर्ट नागरिकांना व्हिसाची आवश्यकता नसताना मुक्तपणे जगभरात प्रवास करण्यास अनुमती देतो.
भारताचे शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेश अनुक्रमे १०६ आणि १०२ व्या क्रमांकावर आहेत. निर्देशांकात पाकिस्तानच्या स्थानामध्ये गेल्या वर्षीच्या काहीच बदल झाला नाही. तर बांगलादेशचे स्थान १०१ वरून १०२ वर घसरले.
विशेष म्हणजे, भारताचा सागरी शेजारी, मालदीवने निर्देशांकात ५६ वे स्थान मिळवले. मालदीवच्या पासपोर्टच्या आधारे ९६ देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो आहे.
दुसरीकडे, चीनने गेल्या वर्षीच्या क्रमवारीत किरकोळ सुधारणा केली आहे, कारण त्याचा क्रम २०२३ मध्ये ६६ वरून यावर्षी ६४ वर गेला आहे. अमेरिकेने देखील गेल्या वर्षीच्या सातव्या स्थानाच्या तुलनेत निर्देशांकात सहावे स्थान मिळवून आपली कामगिरी चांगली केली आहे.
१९९ देशांचे पासपोर्ट तपासले…
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हा इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या डेटावर आधारित आहे यामध्ये गेल्या १९ वर्षांत जगभरातील १९९ भिन्न पासपोर्ट आणि २२७ प्रवासाची ठिकाणे समाविष्ट आहेत. हा निर्देशांक जक महिन्याला अपडेट केला जातो आणि स्वतंत्र देशांच्या नागरिकांसाठी जागतिक मानक म्हणून वापरला जातो.