Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्यासाठी पंजाब ठरणार निर्णायक; आपच्या प्रचाराची धुरा घेणार खांद्यावर
केजरीवाल यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीनेही संबंधित निवडणूक अतिशय कळीची ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते पंजाबमधील प्रचारात स्वत:ला झोकून देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Arvind Kejriwal – पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी आपप्रमाणेच त्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे पंजाबमधील आपच्या प्रचाराची धुरा केजरीवाल स्वत:च्या खांद्यावर घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पंजाबमधील प्रचाराचे रणशिंग फुंकण्यास आप सज्ज झाला आहे. त्या पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ २६ नोव्हेंबरला मोगामधील सभेने होणार आहे. त्या सभेला केजरीवाल, मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. संबंधित सभेनंतर आप संपूर्ण पंजाबमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून देणार आहे.
पक्षाचा प्रचार प्रभावी ठरण्याच्या उद्देशातून केजरीवाल पंजाब दौऱ्यांवर अधिकाधिक फोकस करणार असल्याचे समजते. त्यामुळे पंजाबची निवडणूक केवळ आपसाठीच नव्हे; तर केजरीवाल यांच्यासाठीही राजकीय प्रतिष्ठेची बाब बनल्याचे स्पष्ट होत आहे.
आपने स्थापनेनंतर काही वर्षांतच लक्षणीय मजल मारली. त्या पक्षाने दिल्लीपाठोपाठ पंजाबची सत्ता काबीज केली. मात्र, मागील वर्षी आपला विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे दिल्लीची सत्ता गमवावी लागली.
त्यामुळे भरती अनुभवणाऱ्या आपची ओहोटी सुरू झाल्याच्या चर्चांना तोंड फुटले. अर्थात, पंजाबच्या सत्तेमुळे टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याची संधी आपला उपलब्ध होती. आता त्या राज्याची निवडणूक तोंडावर आली आहे. साहजिकच, आपचे टेन्शन वाढले आहे.
पंजाबची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान त्या पक्षाला पेलावे लागणार आहे. त्या राज्याची निवडणूक आपच्या राजकीय प्रभावासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.
केजरीवाल यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीनेही संबंधित निवडणूक अतिशय कळीची ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते पंजाबमधील प्रचारात स्वत:ला झोकून देण्यासाठी सज्ज झाले आहेत.






