Pashan Lake fish death : महापालिकेचा मोठा दणका! पाषाण तलाव प्रकरणी ४ कर्मचारी निलंबित; मुख्य अभियंत्याला नोटीस
Pashan Lake fish death : पाषाण तलावात मासे मृत झाल्याचे प्रकरण महापालिकेला भोवले; मुख्य अभियंता खानोरे यांना नोटीस तर ४ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन.

Pashan Lake fish death – औंध येथील पाषाण तलावात मोठ्याप्रमाणात मासे मृत झाल्याप्रकरणी मलनि:स्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांच्यासह पाच जणांवर महापालिका आयुक्तांनी तातडीने कारवाई केली आहे. खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर अन्य चार कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात मोठी निलंबनाची कारवाई आहे.
महापालिकेच्या मलनि:स्सारण आणि देखभाल दुरुस्ती विभागाकडील कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे आणि कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कडू, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे आणि विभागीय आरोग्य निरीक्षक विजय भोईर यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर, मलनि:स्सारण विभागाचे प्रमुख जगदीश खानोरे यांना कामातील निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणाबाबत आपल्यावर जबाबदारी निश्चित का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्याचा खुलासा त्वरित महापालिका आयुक्तांकडे सादर करावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय बंद असलेल्या सांडपाणी शुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्पाबाबत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी विभागाकडून खुलासा मागवला आहे.
तसेच प्राइमो कन्सल्टंट यांनाही कारणे दाखवा नोटीस दिली असून, आपले काम बंद का करू नये, अशी विचारणा नोटीशीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, या परिसरातील कारखान्यांच्या इटीपी प्लान्टच्या स्थितीबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या आहेत.
नोटीशीत मुख्य मुद्दे
या घटनेबाबत करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत, पाषाण तलावालगत असलेले सुमारे एक एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले तसेच या केंद्रातील प्रक्रिया न केलेले मैलापाणी हे थेट लगतच्या पाषाण तलावात सोडण्यात येत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तलावातील जलजीवनावर विपरीत परिणाम होऊन तलावातील मासे आणि इतर जीव मृत झाल्याचे दिसून आले. परिणामी परिसरातील पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे, हाच मुद्दा कारणे दाखवा नोटीशीत नमूद केला गेला आहे.






