Paris Paralympics 2024 : भारताची पदकांची हॅट्ट्रिक, अवनी-मोनानंतर ‘प्रीती पाल’ची कांस्यपदकाला गवसणी…

Paris Paralympics 2024 Day 2 (Women’s 100m T35 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा आजचा दुसरा दिवस भारतासाठी चांगला राहिला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताने 90 मिनिटांत तीन पदके जिंकली आहेत. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत अवनी लखेरा हिने सुवर्ण आणि मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकल्यानंतर महिला धावपटू प्रीती पालने ट्रॅक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
भारताच्या प्रीती पाल (Preethi Pal) हिने महिलांच्या 100 मीटर (T35) शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. तिने 100 मीटरचे अंतर 14.31 सेकंदात पूर्ण केले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. या स्पर्धेत चीनच्या गुओ कियानकियानने रौप्यपदक पटकावले. तिने 13.74 सेकंदात शर्यत पूर्ण केली. त्याचवेळी चीनच्याच झोऊ जियाने ही शर्यत 13.58 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले.
BRONZE 🥉 For INDIA 🇮🇳
🏃♀️ Preethi Pal wins bronze medal in the Women’s 100m T35 Final.#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024 #ParaAthletics @mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @ParalympicIndia @PCI_IN_Official @Media_SAI @AkashvaniAIR @DDNational… pic.twitter.com/igEYUhtpmu
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 30, 2024
कोण आहे प्रीती पाल…
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे प्रितीचा जन्म 2000 साली झाला. जन्मानंतर सहा दिवसांनी तिच्या पायाच्या कमकुवतपणामुळे प्लास्टर टाकण्यात आले. यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी ती कॅलिपर घालायची. पुढील 8 वर्षे तिचे आयुष्य असेच राहिले.
वयाच्या 17 व्या वर्षी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅरालिम्पिक खेळांची माहिती मिळाली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिल्लीला आली जिथे तिची फातिमा खातूनशी भेट झाली. त्याच्या मदतीने प्रीतीने 100 आणि 200 मीटर स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.
यानंतर ती साई (SAI) च्या जवाहरलाल नेहरू (JLN) स्टेडियममध्ये प्रशिक्षक गजेंद्र सिंह यांच्यासोबत प्रशिक्षण घेण्यासाठी पोहोचली. तिने येथे आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा केली. प्रितीने 2024 मध्ये जपान (कोबे) येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके जिंकली होती. तिने 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2. मोना अग्रवाल (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)





