Pimpri : राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युग सोनावणने पटकावले कांस्य पदक!

नवी सांगवी : ऑल इंडिया केआयओ राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पुण्याच्या युग सोनावणेनं आपली चमकदार कामगिरी साकारली आहे. ९ वर्ष वयोगटातील वैयक्तिक काता प्रकारात युगने उत्कृष्ट कौशल्य दाखवत संपूर्ण देशात तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदकाची कमाई केली. देहरादून येथे १२ ते १५ जून २०२५ दरम्यान ही स्पर्धा पार पडली.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना युगची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युग गेली तीन वर्षे चॅम्पियन्स कराटे क्लब (सिंहगड रोड शाखा) येथे शिहान संतोष मोहिते आणि सेन्सई शुभम बने यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रशिक्षण घेत आहे. या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ हेच युगच्या मेहनतीला अधिक बळ देणारे ठरले. त्याच्या या यशामुळे पुण्याच्या कराटे खेळाडूंमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.





