Paris Paralympics 2024 : पॅरिसमध्ये टोकियोचा विक्रम निघाला मोडित; पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा रचला नवा किर्तीमान..

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅराथलीटने 6 दिवसांत अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कधीही घडली नव्हती. खरेतर, पॅरिसमध्ये 20 पदकांचा टप्पा गाठून भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 21 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 3 सुवर्ण पदकांसह 8 रौप्य पदके आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारताने पदकतालिकेत 19 वे स्थान पटकावले आहे.
यापूर्वी पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी 19 पदकांची होती. टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारतीय पॅरा ॲथलीट्सनी 19 पदके जिंकली होती. पण आता भारताने पॅरालिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने विक्रमी 19 पदके जिंकली होती. पॅरालिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. 5 सुवर्ण पदकांव्यतिरिक्त, भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 8 रौप्य पदके आणि 6 कांस्य पदके जिंकली होती. पण, आता पॅरिसमध्ये पहिल्या 6 दिवसातच भारतीय पॅराथलीट्सनी पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा : सुवर्णपदक : नेमबाजी
2. मोना अग्रवाल : कांस्यपदक : नेमबाजी
3. प्रीती पाल : कांस्यपदक : ॲथलेटिक्स (शर्यत)
4. मनीष नरवाल : रौप्य पदक : नेमबाजी
5. रुबिना फ्रान्सिस : कांस्य पदक : नेमबाजी
6. प्रीती पाल : कांस्यपदक : ॲथलेटिक्स (शर्यत)
7. निषाद कुमार : रौप्य पदक : ॲथलेटिक्स (उंच उडी)
8. योगेश कथुनिया : रौप्य पदक : ॲथलेटिक्स (थाळीफेक)
9. नितीश कुमार : सुवर्ण पदक : बॅडमिंटन
10. मनीषा रामदास : कांस्यपदक : बॅडमिंटन
11. तुलसीमती मुरुगेसन : रौप्य पदक : बॅडमिंटन
12. सुहास एलवाय : रौप्य पदक : बॅडमिंटन
13. राकेश कुमार/शीतल देवी : कांस्य पदक : तिरंदाजी
14. सुमित अंतिल : सुवर्णपदक : ॲथलेटिक्स (भालाफेक)
15. नित्या श्री सिवन : कांस्य पदक : बॅडमिंटन
16.दीप्ती जीवनजी : कांस्य पदक : ॲथलेटिक्स(शर्यत)
17. अजित सिंग : रौप्य पदक : ॲथलेटिक्स (भालाफेक)
18. सुंदरसिंग गुर्जर : कांस्यपदक : ॲथलेटिक्स (भालाफेक)
19. शरद कुमार : रौप्य पदक : ॲथलेटिक्स (उंच उडी)
20. मरियप्पन थांगावेलू : कांस्यपदक : ॲथलेटिक्स (उंच उडी)
21. सचिन खिलारी : रौप्यपदक : ॲथलेटिक्स (गोळाफेक)
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी…
भारत 1968 पासून पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहे. पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खातेही उघडले नव्हते. यानंतर 1972 मध्ये भारताला पहिले पदक सुवर्णाच्या रूपाने मिळाले. भारताने पुढच्या 2 पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला नाही पण 1984 मध्ये भारतीय पॅराथलीट 4 पदके जिंकण्यात यशस्वी झाले.
यानंतर पुन्हा एकदा भारताला पुढील 4 पॅरालिम्पिकमध्ये खातेही उघडता आले नाही. त्यानंतर 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये भारताला 2 पदके जिंकण्यात यश आले. यानंतर, 2008 बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताला कोणतेही पदक मिळाले नाही आणि 2012 लंडन पॅरालिम्पिकमध्ये केवळ 1 पदकावर समाधान मानावे लागले.
साल 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने 4 पदके जिंकली होती पण त्याची सर्वोत्तम कामगिरी अजून येण बाकी होती. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदके जिंकून नवा विक्रम रचला आणि आता पॅरिसमध्ये भारताने टोकियोमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.





