Paris Paralympics 2024 : भारताच्या नवदीपची ‘सुवर्णझेप’, भालाफेकमध्ये पटकावलं गोल्ड मेडल…

Paris Paralympics 2024 (Men’s Javelin Throw F41 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिली आहे. भारताच्या नवदीप सिंगनं शनिवारी मध्यरात्री झालेल्या (Navdeep Singh) भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि देशाच्या पारड्यात आणखी एक पदक जमा झालं आहे. नवदीपच्या या सुवर्णपदकासह पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांची संख्या 29 झाली आहे. भारताने आतापर्यंत 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत भारत सध्या 18व्या क्रमांकावर आहे.
अवघी 4 फूट चार इंच उंची असणाऱ्या नवदीपनं भालाफेक (F41) स्पर्धेत तब्बल 47.32 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. सुरुवातीला नवदीप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्याचं रौप्यपदक निश्चित झालंच होतं. पण पहिल्या क्रमांकावरच्या इराणच्या सादेह बैत सयाहला गैरवर्तनामुळे अपात्र ठरवण्यात आले.त्यामुळे नवदीप सिंहला रौप्यच्या जागी सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. इराणच्या सादेघ सयाह बेत याने पाचव्या प्रयत्नात 47.64 मीटर अंतरावर भाला फेकला होता.
अंतिम सामन्यात नवदीप सिंगने तिसऱ्या प्रयत्नात 47.32 मीटर भालाफेक केली, जी त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. F41 वर्ग कमी उंचीच्या खेळाडूसाठी आहे.या स्पर्धेत चीनच्या सन पेंग्झियांगने 44.72 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. कांस्यपदक इराकच्या नुखैलावी वाइल्डनला मिळाले. त्याने एकूण 40.46 मीटर फेक केली.
अंतिम फेरीत नवदीपच्या ‘थ्रो’चा तपशील…
पहिला थ्रो – फाउल
दूसरा थ्रो – 46.39 मीटर
तीसरा थ्रो – 47.32 मीटर
चौथा थ्रो – फाउल
पाचवा थ्रो – 46.05 मीटर
सहावा थ्रो- फाउल
7⃣th Gold Medal🥇
Iranian athlete Beit Sayah Sadegh has been disqualified.
As a result, the silver medal has been upgraded to gold, and Navdeep has now secured the Gold medal with a personal best of 47.32m. https://t.co/RsCmEAYgza
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 7, 2024
इराणच्या सादेह याला अपात्र का ठरवण्यात आले?
अंतिम फेरीत नवदीप रौप्य पदकाच्या स्थानावर होता, मात्र या सामन्यानंतर इराणचा अव्वल मानांकित सादेह बैत सयाह याला अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे नवदीपचे रौप्य पदकाचे सुवर्णपदकात रूपांतर झाले. सदेघने पाचव्या प्रयत्नात 47.64 मीटर भाला फेक केली होती, पण त्याच्या गैरकृतीमुळे तो पॅरिस पॅरालिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतणार आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक समितीने सादेह बैत सयाहच्या अपात्रतेची कारणे तपशीलवार उघड केलेली नाहीत. पण असे बोलले जात आहे की इराणच्या खेळाडूने सामन्यादरम्यान वारंवार आक्षेपार्ह झेंडा दाखवला, त्यामुळे त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. यासाठी त्याला सामन्यादरम्यान पिवळे कार्डही दाखवण्यात आले होते, पण त्याच्या कृतीत सुधारणा झाली नाही. सादेह याच्याकडील ध्वज काळ्या रंगाचा होता आणि त्यावर लाल रंगात अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते.
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स (WPA) आचारसंहितेचा नियम ८.१ सांगतो की,”WPA पॅरा ॲथलेटिक्स खेळात सचोटी, नैतिकता आणि आचरणाची सर्वोच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहे. खेळामध्ये सहभागी होणारे खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि प्रशासक यांची ही मानके राखण्याची आणि खेळ निष्पक्ष, प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी आहे.”
भारत पदकतालिकेत 18 व्या स्थानी…
दरम्यान, यावेळी भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये एकूण 29 पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. यात 7 सुवर्ण व्यतिरिक्त 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदतालिकेत 18 व्या स्थानी आहे.





