Paris Paralympics 2024 : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद..! विक्रमी कामगिरीसह भारताची पॅरालिम्पिकची मोहीम पूर्ण; पहा, पदक विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर…

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये 8 सप्टेंबर (रविवार) रोजी, पूजा ओझा ही महिलाच्या कॅनो स्प्रिंट (KL1) 200 मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही आणि यासह भारताचा पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील अस्मरणीय असा प्रवास संपला आहे. कॅनो स्प्रिंट ही चालू पॅरालिम्पिक खेळांमधील भारताची शेवटची स्पर्धा होती. यावेळी भारताने विक्रमी 29 पदके जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताने पदकतालिकेत स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि अर्जेंटिना अशा बलाढ्य देशांना मागे टाकले असून पदकतालिकेत भारत 18 व्या स्थानावर राहिला आहे.
एकंदरीत पाहिल्यास भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली असून यापूर्वीचे विक्रम मोडित निघाले आहेत. यापूर्वी पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी टोकियोमध्ये झाली होती. टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकली होती. यासह भारताने एकूण 19 पदकांसह 24 वे स्थान पटकावले होते.
ॲथलेटिक्समध्ये जिंकली सर्वाधिक पदके…
यावेळी भारताने ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक 17 पदके जिंकली, ज्यात चार सुवर्णांचा समावेश आहे. यानंतर दुसरे स्थान पॅरा बॅडमिंटनचे होते, ज्यामध्ये भारताने एका सुवर्णासह 5 पदके जिंकली. तर पॅराशूटिंगमध्ये भारताने एका सुवर्णासह 4 पदके जिंकली. दुसरीकडे, भारताने पॅरा तिरंदाजीमध्ये एक सुवर्णासह दोन पदके आणि पॅरा ज्युदोमध्ये 1 कांस्य पदक जिंकले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच इतकी सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 सुवर्णपदके जिंकली होती.
साल 1968 ते 2016 या कालावधीत भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत केवळ 12 पदके जिंकली होती. पण भारताने आता मागील दोन पॅरालिम्पिक खेळांमध्ये मिळून चारपट अधिक पदके जिंकली आहेत. भारताने टोकियोमध्ये 19 आणि पॅरिसमध्ये 29 पदके जिंकली आहेत, ज्यांची एकूण संख्या 48 आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची मोठी झेप खूप महत्त्वाची आहे.
सात खेळाडूंची सुवर्णकामगिरी…
पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मुरलीकांत पेटकर हे तेच खेळाडू आहेत ज्यांच्या जीवनावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक नेमबाज अवनी लेखरा हिने जिंकून दिले, जे सुवर्ण पदक होते. यानंतर नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अँटिल (ॲथलेटिक्स,भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी), धरमबीर (ॲथलेटिक्स,क्लब थ्रो), प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स, उंच उडी) आणि नवदीप सिंग (ॲथलेटिक्स,भालाफेक) यांनीही सुवर्णयश मिळविले.
Paris Paralympics 2024 : भारताच्या नवदीपची ‘सुवर्णझेप’, भालाफेकमध्ये पटकावलं गोल्ड मेडल…
हे तीन देश आहेत टाॅप-3 मध्ये…
पॅरालिम्पिक गेम्स 2024 च्या खेळाच्या समाप्तीनंतर पदकतालिकेवर एक नजर टाकल्यास, चीन एकूण 219 पदकांसह पहिल्या स्थानावर राहिला. ज्यामध्ये 94 सुवर्ण, 75 रौप्य आणि 50 कांस्यपदकांचा समावेश आहे. ग्रेट ब्रिटन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 49 सुवर्ण, 44 रौप्य आणि 31 कांस्य पदके जिंकली आहेत. अमेरिका 104 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये 36 सुवर्ण, 41 रौप्य आणि 27 कांस्य पदके आहेत.
Paris Paralympics 2024 : प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’, High Jump T64 स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल…
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : भारताचे पदक विजेते (29 खेळाडू)…
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, महिला 100 मीटर शर्यत (T35)
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 200 मीटर शर्यत (T35)
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस(थाळीफेक) थ्रो (F56)
9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
Paris Paralympics 2024 : भारताच्या हरविंदर सिंगचा तिरंदाजीत ऐतिहासिक ‘सुवर्ण’वेध….
11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाऊंड ओपन
14. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर शर्यत (T20)
17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
18. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
19. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
India wraps up its Paris 2024 outing with seven #Gold medals!
India is currently in 18th place. The country achieved its best-ever haul at a single edition of the Paralympic Games – 29 medals#Paralympics #ParisParalympics2024 #Cheer4Bharat pic.twitter.com/ryOfnnOprT
— PIB India (@PIB_India) September 8, 2024
21. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्णपदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
23. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
24. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
25. कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष ६० किलो (J1)
26. प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
27. होकुटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट(गोळाफेक) (F57)
28. सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 200 मीटर (T12)
29. नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F41)





