Paris Olympics 2024 : बॉक्सिंगमध्ये लोवोलिना-निखतवर असणार भारताची मुख्य मदार…

Paris Olympics 2024 (Boxing) : भारतातील इतर खेळाडूंप्रमाणेच भारतीय बॉक्सर देखील पॅरिस ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे सज्ज आहेत. यावेळी देशाला निखत झरीन आणि टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोवोलिना बोर्गोहेन यांच्याकडून पदकांच्या मोठ्या आशा आहेत. चार महिला आणि दोन पुरुषांचा भारतीय बॉक्सिंग संघात सामावेश आहे. त्यांच्याकडूनही पदकांची आशा असली तरी भारताची मुख्य मदार लोवोलिना- निखतवर असेल.
गत स्पर्धांत चार पदके
बॉक्सिंग ही एक असा क्रीडाप्रकार आहे ज्यात भारताला गेल्या चार ऑलिम्पिकपैकी तीनमध्ये पदके मिळवली आहेत. ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील शेवटची दोन पदके मेरी कोम आणि लोवोलिना बोर्गोहेन या मुलींनी जिंकली आहेत. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंद्र कुमारने भारताकडून बॉक्सिंगमधील पहिले पदक जिंकले होते. त्यावेळी विजेंद्रने पुरुषांच्या 75 किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचाही समावेश करण्यात आला आणि महान महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने इतिहास रचला आणि कांस्यपदक जिंकले. यानंतर 2016 मध्ये या स्पर्धेत देशाला एकही पदक मिळाले नाही, मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये लोवोलिनाने चमत्कार करून कांस्यपदक जिंकत देशाला बॉक्सिंगमध्ये तिसरे पदक मिळवून दिले.
निखतला प्रभाव पाडण्याची संधी
दोन वेळची विश्वविजेती निखत जरीनला तयारीसाठी चांगला वेळ मिळाला आहे. निखतने गेल्या काही वर्षांत तिच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले असून तिला ऑलिम्पिक पदक जिंकून ऑलिम्पिकसारख्या व्यासपीठावर स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल.
लोवलिना यंदा 75 किलो गटात
गेल्या ऑलिम्पिकमध्ये 69 किलोमध्ये पदक जिंकणारी लोवोलिना पॅरिसमध्ये 75 किलोमध्ये स्पर्धा करणार आहे. या वजन गटात तिने जागतिक अजिंक्यपद आणि एशियाड पदके जिंकली आहेत. यासह, महिलांत जास्मिन लांबोरिया(57 किलो) आणि प्रिती पनवारलाही(50 किलो) चकम दाखविण्याची चांगली संधी आहे.
अमित-निशांतवरही नजर
पुरुषांच्या गटात अमित पंघालने एशियाड वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. ऑलिम्पिक पदकासाठी तो कोणतीही कसर सोडणार नाही. त्याच्यासह पुरुषांत पात्रता मिळविलेला निशांत देवही अनुकूल ड्रॉ मिळाल्यास आश्चर्यकारक कामगिरीची नोंद करू शकतो.
इतिहासाच्या पानांत…
1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सात भारतीय बॉक्सर प्रथमच रिंगमध्ये उतरले होते, यामध्ये बिनय बोस, जेनी रेमंड, मॅक जोकिम, रॉबर्ट क्रॅन्स्टन, जॉन नटॉल, रॉबिन भट्ट आणि बाबू लाल यांचा समावेश होता. बाबू लालने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिला सामना बॉटमवेटमध्ये जिंकला जेव्हा त्याने पाकिस्तानच्या अँलन मॉन्टेरोचा पराभव केला. मात्र, बाबू लाल पुढील फेरीत पराभूत झाला होता.
भारतीय बॉक्सिंग संघ
निखत जरीन-50 किलो
प्रीती पवार-54 किलो
जास्मिन लांबोरिया-57 किलो
लोवोलिना बोर्गोहेन- 75 किलो
अमित पंघाल- 51 किलो
निशांत देव- 71 किलो
बॉक्सिंगमध्ये भारत…
मेरी कोम : ऑलिम्पिक : कांस्य, लंडन 2012; जागतिक स्पर्धा-ः सुवर्ण (2002, 2005, 2006, 2008, 2008, 2010, 2018), रौप्य (2001), कांस्य (2019); आशियाई स्पर्धाः सुवर्ण (2014), कांस्य (2014); आशियाई चॅम्पियनशिपः सुवर्ण (2003, 2005, 2010, 2012, 2017), रौप्य (2008, 2021); राष्ट्रकुल स्पर्धाः सुवर्ण (2018).
विजेंदर सिंग : ऑलिंपिक : कांस्य (2008); जागतिक स्पर्धाः कांस्य (2009); राष्ट्रकुलः रौप्य (2006, 2014), कांस्य (2010); आशियाई स्पर्धाः सुवर्ण (2010), कांस्य (2006); आशियाई चॅम्पियनशिपः रौप्य (2004) (2009).
लोवोलिना बोर्गोहेन : ऑलिम्पि कः कांस्य (टोकियो 2020); जागतिक स्पर्धाः सुवर्ण (2023), कांस्य (2018, 2019); आशियाई चॅम्पियनशिपः सुवर्ण (2022), कांस्य (2017, 2021); आशियाई खेळः रौप्य (2023).
अमित पंघाल : जागतिक स्पर्धाः रौप्य (2019); आशियाई खेळः सुवर्ण (2018); राष्ट्रकुल स्पर्धाः रौप्य (2018); आशियाई चॅम्पियनशिपः सुवर्ण (2019), रौप्य (2021), कांस्य (2017).
पूजा राणी : आशियाई चॅम्पियनशिपः सुवर्ण (2019, 2021), रौप्य (2012), कांस्य (2015); आशियाई स्पर्धाः कांस्य (2014)
विकास कृष्ण : जागतिक स्पर्धा : कांस्य (2011); आशियाई खेळः सुवर्ण (2010), कांस्य (2014, 2018); आशियाई चॅम्पियनशिपः रौप्य (2015), कांस्य (2017, 2021); राष्ट्रकुलः सुवर्ण (2018).
सरिता देवी : जागतिक स्पर्धाः सुवर्ण (2006), कांस्य (2005, 2008); आशियाई चॅम्पियनशिपः सुवर्ण (2003, 2005, 2008, 2010, 2012), रौप्य (2001), कांस्य (2017, 2019); राष्ट्रकुलः रौप्य (2014).
शिव थापा : वर्ल्ड चॅम्पियनशिपः कांस्य (2015); आशियाई चॅम्पियनशिपः सुवर्ण (2013), रौप्य (2017, 2021), कांस्य (2015, 2019).
निखत जरीन : जागतिक स्पर्धा : सुवर्ण (2022, 2023); राष्ट्रकुलः सुवर्ण (2022); आशियाई चॅम्पियनशिपः कांस्य (2019); आशियाई स्पर्धाः कांस्य (2023).





