BCCI & Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भारत जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीसह सज्ज आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची ही 26 वी उपस्थिती असेल. यावेळी भारताकडून 117 खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असून भारताच्या पदकांची संख्या दुहेरी आकडीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही बहुराष्ट्रीय स्पर्धा पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी बीसीसीआय 8.5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा सचिव जय शाह यांनी केली आहे. बोर्ड ही रक्कम भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) देणार आहे. जय शाह यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर लिहिले आहे की, “मला ही घोषणा करताना अभिमान वाटतो की, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या खेळाडूंना बीसीसीआय पाठिंबा देत आहे आणि या मोहिमेसाठी आम्ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेला 8.5 कोटी रुपये देत आहोत. आम्ही संपूर्ण भारतीय पथकाला शुभेच्छा देतो. भारताचे नाव उज्जल करा. जय हिंद.”
I am proud to announce that the @BCCI will be supporting our incredible athletes representing #India at the 2024 Paris Olympics. We are providing INR 8.5 Crores to the IOA for the campaign.
To our entire contingent, we wish you the very best. Make India proud! Jai Hind! 🇮🇳…
— Jay Shah (@JayShah) July 21, 2024
दरम्यान, भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण 35 पदके जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात चांगले ऑलिम्पिक राहिले आहे, ज्यामध्ये देशाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकली आहेत.