Panchgani News: दंडात्मक कारवाई कधी होणार? जाहिरात फलकांच्या विळख्यात हरवले पाचगणीचे सौंदर्य
Panchgani News: देशात नाव कमावलेल्या पाचगणी शहराला बेकायदेशीर जाहिरात फलकांचे ग्रहण; सार्वजनिक भिंतींवर खाजगी स्टिकर्सचा सुळसुळाट.

Panchgani News – केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्य आणि देशात स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पाचगणी शहराच्या सौंदर्याला सध्या जाहिरात फलकांचे ग्रहण लागले आहे. स्वच्छतेची आणि पर्यटनाची ओळख पुसून टाकण्याचा घाटच काही बेजबाबदार जाहिरातदारांकडून घातला जात आहे. शहर परिसरात वाढत चालेल्या जाहिरात फलकामुळे पाचगणीला विद्रुपीकरणाचा डाग लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांसह पर्याटकांमधून व्यक्त होत आहे.
शहराची मुख्य ओळख आणि पर्यटकांची वर्दळ असणार्या बस स्थानक परिसरातील भिंती सध्या विविध खाजगी जाहिरातींचे स्टिकर्स आणि पोस्टर्सनी माखलेल्या आहेत. केवळ स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी काही बेजबाबदार जाहिरातदार आणि समाजकंटक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात वाढ झाली असून, पाचगणी पालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांना हे कृत्य थेट आव्हान देत आहे.
पालिका प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
पाचगणी नगरपालिकेने केवळ स्वच्छतेचे पुरस्कार मिळवून शांत न बसता, अशा प्रकारे शहराचे सौंदर्य धोक्यात आणणार्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे जाहिराती, पोस्टर्स लावणार्यांवर ‘मालमत्ता विद्रुपीकरण विरोधी कायद्या’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. स्टिकर्सवर असणार्या मोबाईल नंबर आणि पत्त्यांवरून संबंधित जाहिरातदारांना शोधून त्यांच्याकडून दंडात्मक वसुली करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांसह पर्यटकांमधून व्यक्त होत आहे.





