Satara : पाचगणी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज

भिलार : पाचगणी नगरपालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत काही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांचा उपयोग करून आगीसारखी दुर्घटना असो किंवा पावसाळ्यात येणाऱ्या अनेक अडचणी असोत यावर मात करण्यासाठी या वाहनांच्या माध्यमातून उपयोग होणार आहे.
या वाहनांसंदर्भात माहिती देताना पाचगणी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की 15 व्या वित्त आयोगामधून व घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिकेने ट्रॅक्टर, जेटिंग मशिन, मड पंप व वॉटर टँकर घेतलेले आहेत. या यंत्र साहित्याचा उपयोग दैनंदिन प्राथमिक गरजा भागवण्यासाठी व एखादी आपत्ती उदभवल्यास त्या आपत्तीवर मात करण्यासाठी होणार आहे.
या वाहनांच्या वैशिष्ट्यासंदर्भात माहिती देताना सांगण्यात आले की वॉटर टँकरचा उपयोग शक्यतो पाणीपुरवठा करण्यासाठी होणार आहे. पण एखादी आग लागण्यासारखी परिस्थिती उदभवल्यास या वॉटर टँकरच्या माध्यमातून आग विझवण्यात येणार आहे. त्यासाठी या टँकरला नोजल बसवण्यात आले आहेत. या नोजलच्या वापर करून दोन मजली म्हणजे कमीत कमी 30 ते 40 फूट उंच असलेल्या इमारतीवरील आगही विझवता येऊ शकते असा या वाटर टँकरचा दुहेरी उपयोग करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अग्निशामक गाडी जाऊ शकत नाही अशा रुंद रस्त्यांवर गल्लीबोळामध्ये हा टँकर जाऊ शकतो.
नाले तुंबले असतील तर तो चोकअप काढण्यासाठी जेटिंग मशीनचा उपयोग होत आहे. पावसाळ्यात किंवा ऐनवेळी कचरा जाऊन नाले तुंबत असतात व कचरा या नाल्यांमध्ये साठल्यामुळे नाल्यातील पाणी पुढे ढकलले जात नाही. हे पाणी पुढे ढकलण्यासाठी या जेटिंग मशीनची पाइप या नाल्यांमध्ये सोडली जाते व या जेटिंग मशीनच्या प्रेशरने चोकअप फोडला जातो व साठलेला कचरा बाहेर ढकलला जातो. चोकअप निघून गेल्यामुळे नाल्याचे पाणी नाल्यातून व्यवस्थित बाहेर जाऊ शकते. मळपंपाचा उपयोग नाल्यांमध्ये माती साठले असेल किंवा कचरा साठून राहिला असेल तर ती माती व कचरा नाल्यातून बाहेर खेचून काढण्यासाठी केला जातो.
पावसाळ्यात किंवा इतर वेळी रस्त्यावर झाडं पडली असतील किंवा रस्त्यावर दरड कोसळली असेल तर हे रस्ते साफ करण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागत होता. पण नगरपालिकेने ट्रॅक्टरलाच जेसीबीचे पाते बसवण्यात आले आहे. या गोष्टीसाठी जेसीबीचा उपयोग न करता या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावरील पडलेली झाडे किंवा रस्त्यावर वाहून आलेला चिखल बाजूला सारता येऊ शकेल.
यामुळे नगरपालिकेचा जेसीबीवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. न सांगता येणाऱ्या आपत्तीला सामोरे जायला पाचगणी नगरपालिका सज्ज झाली आहे. या यंत्रांच्या प्रात्यक्षिकाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल जाधव यांनी केली आहे.





