Satara Tourism – इराण अमेरिका या दोन देशातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगातील अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दुबई वारीला सातारकरांनी रामराम केला आहे. सातारा जिल्ह्यातील आणि ट्रॅव्हल कंपन्यांचे विजा ऑन अरायव्हल प्रक्रिया थांबवण्यात आल्याने उन्हाळ्यातील पर्यटनाचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. साधारण दोनशेपेक्षा पासपोर्ट होल्डवर राहिल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांचे सुद्धा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सध्या आखाती देशांसह जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाचे पडसाद आता थेट सातारकर पर्यटकांच्या नियोजनावर उमटू लागले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातून दुबई, बाली, व्हिएतनाम, श्रीलंका, कंबोडिया, भूतान, नेपाळ यांसारख्या प्रमुख देशांकडे जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टूर तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतरच परदेशवारीचे नियोजन करण्याचा निर्णय पर्यटकांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्यातून दर उन्हाळ्याला दुबई वारी अथवा कतार दोहा अबुधाबी येथे फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ट्रॅव्हल कंपनीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातून सरासरी दोनशे ते अडीशे पासपोर्ट या ट्रिपसाठी दिले जातात. इराण सारख्या देशाने त्यांचा बंद केलेला एअर स्पेस आणि हार्मुज बंदराची करण्यात आलेली नाकेबंदी यामुळे मध्य आशियात भू राजनैतिक तणाव प्रचंड वाढला आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर बसला असून हे सर्व पर्यटन पूर्व आशियाकडे वळले आहे. कंबोडिया व्हिएतनाम थायलंड या ट्रीपला प्राधान्य दिले जात आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे ३८ अधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्या कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या नियोजित आंतरराष्ट्रीय सहली स्थगित केल्या आहेत. जोपर्यंत युद्ध थांबून परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत या सहली सुरू होणार नाहीत, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपन्या चालकांकडून देण्यात आली. पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातून विदेशवारी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त सातारकर मोठ्या प्रमाणावर परदेशात स्थायिक आहेत. प्रामुख्याने दुबई, व्हिएतनाम, मलेशिया, बँकॉक, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान ही सर्वाधिक पसंतीची पर्यटनस्थळे आहेत. अनेकांनी उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आपली दुबई आणि आखाती देशांची वारी आगाऊ आरक्षित केली होती. यासाठी नामांकित ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही जय्यत तयारी केली होती. मात्र, अमेरिका, इराण आणि दुबई परिसरातील वाढत्या तणावामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे.