Panchgani News – पाचगणी शहरात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक नमुना समोर आला आहे. जुन्या पोलीस ठाण्यालगतचा मुख्य रस्ता अक्षरशः खचला असून, मोठमोठे खड्डे, तुटलेली जाळी आणि उघड्या ड्रेनेजमुळे हा भाग आता नागरिकांसाठी ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्याच्या मधोमध उघडी पडलेली ड्रेनेज लाईन आणि वाकलेली लोखंडी ग्रेटिंग पाहिली की अंगावर काटा येतो. दुचाकीस्वार, शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिक रोज जीव मुठीत धरून या मार्गाने प्रवास करत आहेत. एक छोटासा तोल गेला तरी थेट खड्ड्यात पडण्याची भीती आहे. विशेष म्हणजे हा रस्ता कोणत्याही दुर्गम भागात नसून थेट जुन्या पोलीस ठाण्यालगत आहे. पोलीस ठाण्याच्या दारातच असा रस्ता असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र संबंधित विभागांनी केवळ पाहणी, आश्वासने आणि कागदी हालचाली केल्या. प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम झालेच नाही. करदात्यांच्या पैशातून रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, मग हा पैसा नेमका कुठे जातो? असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे. महिलांसाठी आणि मुलांसाठी हा भाग अधिक धोकादायक बनला आहे. सकाळी शाळेत जाणारी लहान मुले, बाजारात जाणाऱ्या महिला आणि वृद्ध नागरिकांना रोज या रस्त्यावरून जाताना भीती वाटते. रात्री पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होते. अंधारात एखादी व्यक्ती थेट उघड्या ड्रेनेजमध्ये पडली तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर प्रशासनाकडे आहे का? जुन्या पोलीस ठाण्यालगतचा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, नवीन मजबूत ग्रिलिंग बसवावी आणि पाचगणी शहरातील सर्व धोकादायक रस्त्यांचे तांत्रिक ऑडिट करून सार्वजनिक अहवाल जाहीर करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.