Palkhi Marg: नितीन गडकरींच्या दौऱ्याचा अखेर मोठा इम्पॅक्ट! ३ वर्षांपासून रखडलेला पालखी मार्गाच्या कामाला वेग
Palkhi Marg: नितीन गडकरी यांच्या पाहणी दौऱ्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाला अखेर गती; भवानीनगर भागात गटर लाईनचे काम वेगाने सुरू.

Palkhi Marg – गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाला अखेर पुन्हा गती मिळाली असून भवानीनगर परिसरात रस्त्यालगत गटर लाइनचे काम वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे पालखी मार्गाचे काम पूर्ण होण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली असली, तरी हे काम पुन्हा अर्धवट थांबू नये, अशी अपेक्षा वाहनचालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
महिनाभरापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर ते लिमटेक दरम्यानच्या पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी त्यांनी विविध गावांमध्ये थांबून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याने वाहतूक, अपघात आणि नागरिकांच्या दैनंदिन हालअपेष्टा वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी त्यांना दिली होती. त्यानंतर अवघ्या महिनाभरात कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
यंदा 16 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीहून बांदलवाडी, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी, भवानीनगर मार्गे सणसर येथे मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे पालखीपूर्वी संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालखी पुढे सरकल्यानंतर इंदापूर ते लिमटेक या मार्गावरील उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पालखी मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे असून काही ठिकाणी वाहतुकीसाठी तात्पुरती वळणे देण्यात आली आहेत. अनेक पूल अद्याप अपूर्ण आहेत.
पालखी सोहळ्यादरम्यान हजारो वारकरी या मार्गावरून पायी प्रवास करणार असल्याने काही ठिकाणी अरुंद झालेला रस्ता अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालखीपूर्वी आवश्यक ते अडथळे दूर करण्याची मागणी होत आहे. या मार्गावरील काही पुलांवर विजेचे खांब बसविण्यात आले असले, तरी त्यावरील दिवे अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.




