PMRDA Action: पालखी मार्गावर पीएमआरडीएचा हातोडा! तब्बल ७० अनधिकृत होर्डिंग्ज केले भुईसपाट
PMRDA Action: हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील पालखी मार्गांवरील १२३ होर्डिंग्जचे सर्वेक्षण; ७० बेकायदेशीर होर्डिंग्ज अखेर निष्कासित.

PMRDA Action – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जवर मोठी कारवाई केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली. आतापर्यंत ७० अनधिकृत होर्डिंग्ज बांधकाम विभागाने भुईसपाट केली आहेत. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा आणि वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा,
या उद्देशाने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मे महिन्यातच या मार्गांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने पीएमआरडीएच्या हद्दीतील हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील पालखी मार्गांवरील सुमारे १२३ होर्डिंग्जचे सविस्तर सर्वेक्षण केले. त्यानंतर बेकायदेशीरपणे उभारलेली तब्बल ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आली. काही अनधिकृत होर्डिंगधारकांनी आपली होर्डिंग्ज स्वतःहून काढून घेतली आहेत.
केवळ मुख्य पालखी मार्गच नव्हे, तर पीएमआरडीए हद्दीतील पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख मार्गांवरील आणि मोक्याच्या ठिकाणांवरील होर्डिंग्जचेही सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये अनधिकृत अथवा विनापरवाना उभारलेली होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिला. व्यावसायिक आणि जाहिरातदारांनी पीएमआरडीएची रीतसर परवानगी घेऊनच होर्डिंग्ज उभारावीत; अन्यथा प्रशासनाकडून थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही पीएमआरडीए प्रशासनाने दिला आहे.
“पीएमआरडीएच्या हद्दीत कुठेही होर्डिंग्ज उभारताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमबाह्य आणि विनापरवाना उभारलेल्या होर्डिंग्जवर कोणतीही गय न करता थेट कारवाई केली जाईल.”
– डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए





