पालखी मार्ग भूसंपादनाचे पाच गावांत 68 कोटी वाटप

खळद (पुणे) – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आळंदी-पंढपूर पालखी महामार्गावरील पुरंदर विधानसभा मतदार संघाच्या हद्दीतील भेकराई नगर ते नीरा या मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. याबाबत भूसंपादनासाठी 395 कोटी रक्कम मंजूर आहे. यातील 5 गावांना 68 कोटींचे वाटप झाले आहे. उर्वरित रक्कम दोन ते तीन आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याने वर्ग होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आमदार जगताप म्हणाले की, महामार्गावरील 17 गावे पुरंदर तालुक्याच्या हद्दीत असून यातील पिसुर्टी, दौंडज, पिपरे खुर्द, जेऊर आणि कोळविहीरे या 5 गावांना भूसंपादनाचे 68 कोटींचे वाटप झाले आहे. तर पुरंदर आणि हवेलीतील उर्वरित गावांतील भूसंपादनाचे पैसे दोन ते तीन आठवड्यांत मिळणार आहेत. या रखडलेल्या महामार्गाचे नीरा ते जेजुरीपर्यंतचे काम सहा महिन्यांत तर जेजुरी ते भेकराईनगर या मार्गाचे काम पुढील सहा महिन्यांत अशा दोन टप्पांत होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार सिप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
उरुळी येथील कचरा डेपोला 25 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली असून हा डेपो रद्द करावा यासाठी प्रदूषण महामंडळाच्या माध्यमातून सूचना केल्या आहेत. तसेच मंतरवाडी ते कोंढवा बायपास रस्त्याचे कामही उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून निधी मिळवून सुरू झाले आहे. याबरोबरच या भागातील फुरसुंगी, देवाची उरुळी, भेकराईनगर येथील 85 कोटींची पाणी योजना मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. तसेच संरक्षण विभागाच्या हद्दीतून ही जलवाहिनी जाण्यासाठी नाहरकत परवानगी दिली असल्याने फेब्रुवारीपर्यंत योजनेचे पाणीही येथील नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- विमानतळ पुरंदरमध्येच
पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत, विमानतळ हे पुरंदरमध्येच आणि शेतकऱ्यांच्या विरोधाशिवाय होणार आहे. तसेच गुंजवणीबाबत काहींनी माझा अभ्यास नसल्याची टीका केली होती. 4 वर्षांपूर्वीच यांचा अभ्यास केला असून त्यात सुधारणा केल्या आहेत. आधीची योजना केवळ ठेकेदारांची धार्जिन आणि 90 टक्के बागायती असणाऱ्या भागासाठी होती. वास्तविक पुरंदरच्या दुष्काळी भागाला याची अधिक गरज असून त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाला सूचना केल्या आहेत. भोर, वेल्हा आणि पुरंदरच्या हक्काचे पाणी योग्य वेळेत मिळणार आहे.






