Abid Mocks India : “भारताला हरताना पाहण्यातच आनंद…”, टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूच वक्तव्य
Abid Mocks India : भारतीय क्रिकेट वर्तुळात निराशेचे वातावरण असतानाच, शेजारील देश पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आबिद अली याने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

Pakistani Cricketer Abid Ali Controversial Post India Loss : आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला मिळालेल्या २-० अशा ऐतिहासिक पराभवामुळे भारतीय क्रीडाप्रेमी अजूनही धक्क्यात आहेत. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी टी-२० विश्वचषक जिंकणारा बलाढ्य भारतीय संघ आयर्लंडसारख्या नवख्या संघाकडून मालिका कसा काय गमावू शकतो, यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. भारतीय क्रिकेट वर्तुळात निराशेचे वातावरण असतानाच, शेजारील देश पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आबिद अली याने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
पाकिस्तानी खेळाडूने एक्सवर ओकली गरळ –
भारताच्या या पराभवावर आबिद अलीने एक अत्यंत वादग्रस्त विधान केले असून त्याची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर आबिद अलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत लिहिले, “भारत देशाला क्रिकेटच्या मैदानात पराभूत होताना पाहण्यातच खरा आनंद आहे.” त्याच्या या खोडसाळ विधानानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Abid Ali reacts to India’s historic T20I series defeat against Ireland with a cheeky post 😂☘️#TOKSports #AbidAli #INDvIRE pic.twitter.com/3sGFapGC4m
— TOK Sports (@TOKSports021) June 29, 2026
केवळ २ वर्षांत संपले आंतरराष्ट्रीय करिअर –
वादग्रस्त विधान करणाऱ्या आबिद अलीच्या कारकिर्दीचा आलेख पाहिला, तर त्याचे आंतरराष्ट्रीय करिअर अवघ्या दोन वर्षांत संपुष्टात आले होते. त्याने २०२१ मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने पाकिस्तानसाठी १६ कसोटी सामन्यांत ४९.१६ च्या सरासरीने ४ शतकांसह १,१८० धावा केल्या आहेत, तर ६ वनडे सामन्यांत २३४ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये (फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए) त्याने एकूण ३७ शतके ठोकत १५ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
पाकिस्तानही आयर्लंडकडून झालाय पराभूत –
भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्धच्या क्रिकेट इतिहासातील हा पहिलाच पराभव आणि पहिलीच मालिका हार आहे. आबिद अली भारताच्या पराभवावर आनंद साजरा करत असला, तरी तो स्वतःचा इतिहास विसरला आहे. पाकिस्तानचा संघ देखील २०२४ मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० सामना लाजिरवाण्या पद्धतीने हरला होता, याची आठवण नेटकरी त्याला करून देत आहेत.





