Pakistan Cricket Controversy : क्रिकेट विश्वात खळबळ! सीनियर खेळाडू पतीसह हॉटेलमध्ये राहिल्याने मोठा वाद; कॅप्टन आणि हेड कोच भिडले
Pakistan Cricket Controversy : सध्या पाकिस्तानी संघातील अंतर्गत वादाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Pakistan Women Cricket Team Controversy : महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी राहिली आहे. संघाने आपले सर्व सामने गमावले असून एकही विजय मिळवता आलेला नाही. मात्र, या दारुण पराभवापेक्षाही सध्या पाकिस्तानी संघातील अंतर्गत वादाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना आणि मुख्य प्रशिक्षक वहाब रियाझ यांच्यात संघ निवडीवरून प्रचंड वाद झाला आहे. त्यातच सीनियर खेळाडू आलिया रियाझ (Aliya Riaz) हिच्या शिस्तभंगाच्या वागण्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण कमालीचे तापले आहे.
कर्णधार आणि वहाब रियाझ यांच्यात जुंपली!
२३ जून रोजी लीड्स येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचा चौथा पराभव झाल्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आला. मिळालेल्या माहितीनुसार, संघ निवडीवरून कर्णधार फातिमा सना आणि हेड कोच वहाब रियाझ यांच्यात तीव्र मतभेद होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फातिमा सनाला खराब फॉर्ममध्ये असलेल्या आलिया रियाझला संघातून डच्चू द्यायचा होता. परंतु, वहाब रियाझने आपल्या अधिकाराचा वापर करत आलियाला खेळवण्याचा हट्ट धरला. पाकिस्तान तो सामनाही हरला आणि या लाजिरवाण्या पराभवानंतर संतापलेल्या फातिमाने थेट सर्वांसमोर वहाब रियाझलाच पराभवासाठी दोषी ठरवले.
प्रॅक्टिस सोडून पतीसोबत फिरणे आणि हॉटेल रूममधील वाद –
🚨🚨 Reports suggest a heated exchange took place between Fatima Sana & Wahab Riaz after Pakistan’s defeat to Australia.
The dispute was reportedly over Alia Riaz’s inclusion in the playing XI despite missing net practice. After Alia was dismissed cheaply, Fatima reportedly told… pic.twitter.com/wiGWpVZ6id
— 𝐀 (@was_abdd) June 23, 2026
या वादाला आणखी एक गंभीर वळण मिळाले, जेव्हा आलिया रियाझचे पती अली युनिस हे अधिकृत ‘टीम हॉटेल’मध्ये तिच्याच खोलीत राहत असल्याचे समोर आले. कर्णधार फातिमा सनाने यावर तीव्र आक्षेप घेतला. फातिमाच्या तक्रारीनंतरच अली युनिस यांना हॉटेलची खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले.कीळसवाणी गोष्ट म्हणजे, बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानी संघाचे सराव सत्र असताना आलिया प्रॅक्टिस सोडून पतीसोबत बाहेर फिरायला गेली होती.
या विश्वचषकात आलिया पूर्णपणे फ्लॉप ठरली असून तिने ४ सामन्यांत ८.७ च्या सरासरीने अवघ्या ३५ धावा केल्या आहेत. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये असे अंतर्गत वाद नवीन नाहीत, पुरुष संघाच्या ड्रेसिंग रूममधूनही अशा तणावाच्या बातम्या येत असतात. आता या गंभीर शिस्तभंगाच्या प्रकरणावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





