PAK vs ZIM 3rd T20 Match Result : झिम्बाब्वेनं तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा उलटफेर केला आहे. या संघाने चमकदार कामगिरी करत रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. झिम्बाब्वेने विजयासाठीचे 133 धावांचे लक्ष्य एक चेंडू बाकी असताना गाठले. डावाच्या शेवटच्या षटकात टिनोटेंडा मापोसाने शानदार फलंदाजी करत 4 चेंडूत 12 धावा करत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. मात्र, पाकिस्तान संघ 2-1 ने मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला.
Zimbabwe pick up a consolation win by 2 wickets in a match that went down to the wire at Queens Sports Club! #ZIMvPAK #VisitZimbabwe pic.twitter.com/1qQSPKWve0
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 5, 2024
तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गडी गमावून 132 धावा केल्या होत्या. पाकिस्तानसाठी कर्णधार सलमान आगाच्या बॅटमधून सर्वाधिक 32(32) धावा झाल्या. या खेळीत त्याने 3 चौकार मारले. अराफत मिन्हासने नाबाद 22(26) धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने 2 चौकार मारले. याव्यतिरिक्त तय्यब ताहीरने 14 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावा तर कासिम अक्रमने 15 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. झिम्बाब्वेसाठी गोलंदाजीत वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी याने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारवा, टिनोटेंडा माफोसा आणि रायन बर्ल यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 19.5 षटकांत 8 गडी गमावून 133 धावा करून सामना जिंकला. झिम्बाब्वेकडून सलामीवरी ब्रायन बेनेटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 35 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावांची खेळी केली. कर्णधार सिकंदर रझाने 20 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 19 धावा तर तदिवनाशे मरुमणीने 6 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या.
शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी 12 धावांची गरज होती आणि पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र, टिनोटेंडा माफोसाने पुढच्या काही चेंडूंमध्ये खेळ पूर्णपणे फिरवला. टिनोटेंडा मापोसाने 4 चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर नाबाद 12 धावा करत सामना झिम्बाब्वेच्या झोळीत टाकला. पाकिस्तानकडून गोलंदाजीत अब्बास आफ्रिदीने सर्वाधिक 3 बळी घेतले. जहाँदाद खानला 2 बळी मिळाले. कर्णधार सलमान आणि सुफियान मुकीमने प्रत्येकी एक विकेट घेतली.