ZIM vs PAK : लाजीरवाण्या पराभवानंतर पाकचं जोरदार कमबॅक, दुसऱ्या वनडेत झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनं उडवला धुवा…

Zimbabwe vs Pakistan 2nd ODI : पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबर रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत झिम्बाब्वेला 145 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सैम अयूबच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकनं 18.2 षटकात एकही गडी न गमावता सामना जिंकला. शतकवीर सैम अयूब सामन्याचा मानकरी ठरला.
या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार पहिल्या वनडेत पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून 80 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. आता पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुलावायो येथे 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
The @SaimAyub7 storm helps Pakistan cruise to an emphatic 🔟-wicket win in the second ODI! 🙌
The series decider will take place on Thursday 🏏#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/73srWTUF5H
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
झिम्बाब्वेच्या 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. सैम अयुब आणि अब्दुल्ला शफीक या सलामीच्या जोडीने आपल्या संघाला चांगली सुरुवात तर दिलीच पण 18.2 षटकात एकही विकेट न गमावता 148 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून सैम अयुबने शानदार शतक झळकावले. त्याने अवघ्या 62 चेंडूंचा सामना करताना 17 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा केल्या. सैम अयुबचे हे वनडेतील पहिले शतक ठरले तर अब्दुल्ला शफीक 48 चेंडूंत 4 चौकारांसह 32 धावा करून नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात खराब झाली. उर्वरित काम नियमित अंतराने पडणाऱ्या विकेट्सने पूर्ण केले. झिम्बाब्वेकडून डिऑन मेयर्सने सर्वाधिक 33, सीन विल्यम्सने 31, सिकंदर रझाने 17, कर्णधार क्रेग एर्विनने 18 तर ब्रायन बेनेटने 14 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेच्या उर्वरित खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 32.3 षटकांत 145 धावांत गडगडला.
ZIM vs PAK 1st ODI : पाकिस्तानचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी मिळवला विजय…
पाकिस्तानचा लेगस्पिनर अबरार अहमद या सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 8 षटकांत 33 धावा देऊन 4 बळी घेतले, ज्यात दोन मेडन षटकांचाही समावेश होता. तर सलमान आघाने 7 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले, तर सैम अयुब आणि फैसल अक्रमने प्रत्येकी 1 बळी घेतला.



