PAK vs ENG : पाकिस्तानविरुद्धच्या निर्णायक कसोटीसाठी इंग्लंडची Playing-XI ची घोषणा, संघात दोन मोठे बदल…

PAK vs ENG 3rd Test England Playing XI : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली तीन कसोटी सामन्यांची मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता गुरुवार 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडीत तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने येतील.
निर्णायक अशा या सामन्यासाठी इंग्लंडने मंगळवारी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. वेगवान गोलंदाज ब्रेडेन कार्स आणि मॅथ्यू पॉट्स या दोन खेळाडूंना इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. या दोघांच्या जागी वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन आणि फिरकी गोलंदाज रेहान अहमदला संघात स्थान देण्यात आले आहे.
रेहान अहमदने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते आणि डिसेंबर 2022 मध्ये पहिल्याच सामन्यात कराचीमध्ये पाकिस्तानच्या नाकी नऊ आणताना सात विकेट घेतल्या होत्या . या मालिकेत 20 वर्षांचा रेहान पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. तो आतापर्यंत एकूण चार कसोटी खेळला आहे. इंग्लंडला पुन्हा एकदा रेहान अहमदकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
गस ऍटकिन्सनबद्दल सांगायचे तर, या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो खेळला होता आणि त्याने चार विकेट घेतल्या होत्या, परंतु दुसऱ्या कसोटीत त्याला संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानमध्ये टर्निंग पिच बनवण्याची तयारी जोरात सुरू आहे. पाकिस्तानचे निवडकर्ते स्वतः रावळपिंडीत टर्निंग पिच तयार करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळए तिसऱ्या कसोटीत फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ते पाहता इंग्लंडनं संघात दोन बदल केले असण्याची शक्यता आहे.
🔒Locked in: Our XI for the final Test pic.twitter.com/RNn82j4ZD4
— England Cricket (@englandcricket) October 22, 2024
इंग्लंड संघाची प्लेईंग 11 पुढीलप्रमाणे – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, जॅक लीच आणि शोएब बशीर.
मालिकेतील दोन्ही सामने मुलतानच्या स्टेडियममध्ये झाले. इंग्लंडने पहिला सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला तर पाकिस्तानने दुसरी कसोटी 152 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी केली. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी दुसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी करत 20 बळी घेतले. नोमान अलीने 11 तर साजिद खानने 9 विकेट घेतल्या.





