ENG vs PAK 2nd Test : ‘साजिद-नोमान’च्या फिरकीपुढे इंग्लंडचं लोटांगण, दुसऱ्या कसोटीत पाकचा दणदणीत विजय…

Pakistan vs England 2nd Test : मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने इंग्लंडचा 152 धावांनी पराभव केला आहे. दुसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 366 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 291 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानने 75 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या डावात 221 धावा केल्या आणि 296 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर विजयासाठी 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 144 धावांवर आटोपला.
पाकिस्तानने 1349 दिवसांनंतर घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला असून शान मसूदच्या नेतृत्वाखाली संघाचा हा पहिला विजय आहे. या कसोटीसाठी संघात समाविष्ट असलेला फिरकी गोलंदाज नोमान अलीने या सामन्यात एकूण 11 तर दुसरा फिरकी गोलंदाज साजिद खान (Sajid Khan) याने 9 विकेट घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. साजिद खान हा सामन्याचा मानकरी ठरला. तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडीत खेळवला जाणार आहे.
पाकचा पहिला डाव….
पाकिस्तानने पहिल्या डावात 366 धावा केल्या होत्या. यादरम्यान सामन्यातून पदार्पण करणाऱ्या कामरान गुलामने 118 धावांची शतकी खेळी केली. तर सॅम अयुबने 77 ,मोहम्मद रिझवानने 41, आमेर जमालने 37, सलमान अली आगाने 31 आणि नोमान अलीने 32 धावा केल्या. इंग्लंडकडून यादरम्यान जॅक लीचने सर्वाधिक 4 तर ब्रायडन कार्सने 3 गडी बाद केले. मॅथ्यू पॉट्सने 2 विकेट्स घेतल्या. तर शोएब बशीरने 1 विकेट घेतली.
इंग्लंडचा पहिला डाव…
प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली होती आणि एका क्षणी 2 विकेट गमावून 211 धावा केल्या होत्या. पण इथून साजिद खान आणि नौमान अली यांनी मिळून पुढच्या 80 धावांत इंग्लिश संघाच्या उरलेल्या सर्व 8 विकेट्स घेतल्या. यासह इंंग्लंडचा पहिला डाव 291 धावसंख्येवर संपुष्टात आला आणि पाकिस्तानने 75 धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डेकट याने सर्वाधिक 114 धावांची खेळी केली तर पाकिस्तानकडून साजिद खान याने सर्वाधिक 7 तर नोमान अलीने 3 विकेट्स घेतल्या.
पाकचा दुसरा डाव
साजिद खाननंतर इंग्लंडच्या शोएब बशीर आणि जॅक लीच या जोडीनेही खेळपट्टीच्या मदतीचा पुरेपूर फायदा घेतला. यजमान संघ दुसऱ्या डावात केवळ 221 धावा करून सर्वबाद झाला. आघा सलमानने संघाकडून सर्वाधिक 63 धावा केल्या. तर सौद शकीलने 31, कामरान गुलामने 26 , मोहम्मद रिझवानने 23 आणि साजिद खानने 22 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जॅक लिचने 3, शोएब बशीरने 4, ब्रेडन कार्सने 2 आणि मॅथ्यू पॉट्सने 1 बळी घेतला.
इंग्लंडचा दुसरा डाव….
पाकिस्तानने पहिल्या डावातील 75 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 221 धावांसह इंग्लंडसमोर विजयासाठी 297 धावांचं लक्ष ठेवलं. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात इंग्लंडची वाईट सुरुवात झाली. 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 144 धावांवर गारद झाला. पहिल्या डावात शतक झळकावणारा सलामीवीर बेन डकेट याला भोपळाही फोडता आला नाही तर जॅक क्रोली तीन धावा करून माघारी परतला. याशिवाय ऑली पोप 22 धावा, जो रूट 18 धावा, हॅरी ब्रूक 16 धावा, कर्णधार बेन स्टोक्स 37 धावा, जेमी स्मिथ 06 धावा, ब्रेडन कार्स 27 धावा आणि जॅक लीच एक धावा करून बाद झाले आणि इंग्लंडला 152 धावांनी पराभव स्विकारावा लागला. या डावात पाकिस्तानकडून फक्त दोन फिरकी गोलंदाजांनी गोलंदाजी केली. साजिदने दोन तर नोमानने आठ गडी बाद केले.
Only the 2️⃣nd time for Pakistan that all 2️⃣0️⃣ wickets have been shared by two bowlers and the first such occurrence since 1972 in Tests 🙌
Sajid and Noman help Pakistan square the series in Multan 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/VFM1r6wwve
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 18, 2024
44 महिन्यांनंतर पाकचा मायदेशात विजय…
पाकिस्तान संघाने 44 महिन्यांनंतर मायदेशात कसोटी सामना जिंकला आहे. त्यांनी मायदेशात शेवटची कसोटी फेब्रुवारी 2021 मध्ये रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकली होती. त्यावेळी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 95 धावांनी पराभव केला होता. यानंतर संघाने 12 कसोटी खेळल्या आहेत. यापैकी पाकिस्तान संघाने एक विजय मिळवला आहे. चार कसोटी अनिर्णित राहिल्या आणि सातमध्ये पाकिस्तान संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.





