Pak vs Aus ODI Series : पाकिस्तानने रचला इतिहास…! 22 वर्षांनंतर केली ‘अशी’ कामगिरी की विश्वविजेत्या ‘कांगारुं’ची मायदेशातच झाली मोठी नाचक्की….

Australia vs Pakistan 3 Match ODI Series : वेगवान गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तानने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह पाकिस्तानने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. पाकिस्तानने 22 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
A convincing win in Perth completes a come-from-behind series triumph for Pakistan! 👏
Winning start for Rizwan in his first series as captain 🏏🙌#AUSvPAK pic.twitter.com/tP4zoOdv6E
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 10, 2024
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम खेळताना 31.5 षटकात अवघ्या 140 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर हरिस रौफने 2 आणि मोहम्मद हसनैनला एक विकेट मिळाली. यानंतर पाकिस्तानने 26.5 षटकांत फक्त दोन गडी गमावताना 143 धावा करत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. फलंदाजीत सॅम अयुबने 42, अब्दुल्ला शफीकने 37 धावा, बाबर आझमने नाबाद 28 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 30 धावा केल्या. बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. दोघांमध्ये नाबाद 58 धावांची भागीदारी झाली.
ऑस्ट्रेलियाचे सर्व दिग्गज ठरले अपयशी
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला नसीम शाहने बाद केले. एका चौकाराच्या जोरावर त्याला 9 चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला ॲरॉन हार्डीही जास्त वेळ क्रीजवर टीकू शकला नाही. हार्डीला शाहीन आफ्रिदीने बाद केले. तो 13 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 36 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कांगारूंना कर्णधार जोश इंग्लिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली.
जोश इंग्लिश 19 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने सात धावा करून बाद झाला. नसीम शाहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हारिस रौफने सेट झालेल्या मॅथ्यू शॉर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तो 30 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. टॉप ऑर्डर पूर्ण फ्लॉप झाल्यानंतर शेवटची आशा मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून होती. पण हे दोन दिग्गजही पाकिस्तानी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. 25 चेंडूत आठ धावा करून स्टॉइनिस बाद झाला तर मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून सीन ॲबॉटने सर्वाधिक 30 धावा केल्या. लोअर ऑर्डर ॲडम झाम्पाने 13 धावांची आणि स्पेन्सर जॉन्सनने 12 धावांची नाबाद खेळी खेळली. या मालिकेत एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही.





