PAK vs AUS 2nd ODI Highlights : तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया संघास त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 गडी राखून पराभव केलं. पाकिस्तानने हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. असा एकही क्षण आला नाही की जेव्हा असे वाटले की, ऑस्ट्रेलिया सामन्यात आहे. पाठलाग करताना पाकिस्तानकडून सॅम अयुबने 82 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली तर गोलंदाजीत हारिस रौफने गोलंदाजीत पाच फलंदाजांना माघारी धाडलं.
नाणेफेक जिंकण्यापासून ते सामन्यात पाकिस्तानसाठी सर्व काही ठीक झाले. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तान संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी खूप प्रभावी ठरला. प्रथम फलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानी गोलंदाजांनी 35 षटकांत अवघ्या 163 धावांत गुंडाळले. स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 48 चेंडूत 35 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.
या काळात पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक 5 बळी घेतले. रौफने 8 षटकांत केवळ 29 धावा दिल्या. या चमकदार कामगिरीसाठी रौफला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. याशिवाय शाहीन आफ्रिदीने 3 विकेट्स घेतल्या. उर्वरित 1-1 विकेट नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन यांनी मिळवल्या.
As commanding as it gets 💪@imabd28 and @SaimAyub7‘s brilliant innings lead Pakistan to a nine-wicket win with 141 balls to spare! 🏏#AUSvPAK pic.twitter.com/pgQ1o5qcTb
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 8, 2024
पाकिस्तानने एकतर्फी नोंदवला विजय
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 50 षटकांत 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने हे आव्हान अवघ्या 26.3 षटकांत 1 बाद 169 धावा करून सहज गाठले. यावेळी संघासाठी सलामी देणाऱ्या सॅम अयुब आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी 137 धावांची (123 चेंडू) भागीदारी केली. पाकिस्तानला पहिला धक्का 21व्या षटकात बसला, जेव्हा सॅम अय्युब 71 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 82 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुस-या विकेटसाठी अब्दुल्ला शफीक आणि बाबर आझम यांनी 32 (37) धावांची अखंड भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान शफीकने 69 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. तर बाबरने 20 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 15 धावा केल्या.
पाकचा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा विजय..
पाकिस्तानने या सामन्यात 26.3 षटकामध्ये 1 विकेट गमावून 169 धावा केल्या म्हणजेच पाकिस्तानने विजयी आव्हान हे 141 चेंडू राखून पूर्ण केलं. पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलियातील सर्वात जास्त चेंडू राखून मिळवलेला पहिला आणि मोठा विजय ठरला. तर पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विकेट्सच्या हिशोबाने हा संयुक्तरित्या पहिला मोठा विजय ठरला. पाकिस्तानने याआधी 11 डिसेंबर 1988 साली एडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सने पराभूत केलं होतं. पाकिस्तानने तेव्हा ऑस्ट्रेलियाविरूध्द 34 चेंडू राखून विजय मिळवला होता.