Pabal Suicide Case – पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह आणि अवघ्या चार महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) आणि गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे (रा. बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा) येथील असून सध्या पाबळ येथील एकेरी माळ भागात एका वीटभट्टीवर कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. शनिवारी आणि रविवारी (दि. १) देखील त्यांच्यात वाद झाले होते. याला कंटाळून रविवारी सकाळी भाग्यश्री ही दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडली. सोबत सार्थकची सायकलही होती. दुपारपर्यंत ती घरी न परतल्याने शोध सुरू झाला असता, घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीच्या कडेला सायकल आणि चपला आढळून आल्या.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीच्या काठावर लहान मुलाची सायकल आणि चपला पाहून उपस्थित जनसमुदायाकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.या दुर्दैवी घटनेबाबत मृत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू पांडुरंग जाधव (वय ३२) याच्याविरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.