प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील अडीच तोळे सोने व पन्नास हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले असे चोरी करणाऱ्या चोरट्याचे, तर धोंडीबा अर्जुन उगले असे चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवन जवळ राहणारे गुलाब बाबुराव नरके (वय ६९) हे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून हॉस्पिटलच्या कामाने पुण्याला गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते परतले असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याचे आढळून आले. या प्रकरणी नरके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले (वय २५, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीचे दागिने धोंडीबा उगले याला विकल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत धोंडीबा अर्जुन उगले (वय ३८, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला देखील अटक केली. याचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहेत.