Israel Strike : ओलिसांच्या हत्येनंतर इस्रायलमध्ये संतापाची लाट; देशव्यापी सार्वत्रिक संप

Israel –हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या ६ ओलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इस्रायली नागरिकांची सुरक्षित सुटका होऊ न शकल्याच्या निषेधार्थ इस्रायलमधील सार्वजनिक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे.
इस्रायलमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळासह सर्व सार्वजनिक उद्योग बंद ठेवण्यात आले आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय निर्माण झाला. मात्र काही क्षेत्रांमध्ये हा बंद पाळला गेला नाही. त्यामुळे ओलिसांच्या हत्येच्या मुद्यावरून राजकीय पातळीवर तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी देशभरात बघायला मिळाले.
गाझामध्ये सहा ओलीस मृतावस्थेत सापडल्यानंतर लाखो इस्रायली रविवारी उशिरा निषेध करण्यासाठी आणि संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. ओलिसांच्या हत्येसाठी नागरिकांनी पंतप्रदान बेन्जामिन नेतान्याहू यांनाच जबाबदार धरले. जवळपास ११ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी हमाससोबत युद्धबंदी करार केला गेला असता, तर करारात त्यांओलिसांना जिवंत परत आणता येऊ शकले असते, असे नागरिकांचे म्हणणे होते.
तर दुसऱ्या गटाने नेतान्याहू यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासला पूर्णपणे संपवणेच गरजेचे आहे. त्यामुळे हमासबरोबर युद्धबंदी करता कामा नये, ही नेतान्याहू यांची भूमिका योग्यच आहे, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.
ओलिसांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि युद्धबंदी करार करून हमास विरुद्धचे युद्ध समाप्त करण्याच्या मागणीसाठीचे आंदोलन रात्रभर सुरूच होते. तेल अवीव, आयडीएफचे मुख्यालय असलेल्या किरिया लष्करी तळाच्या बाहेर देखील निदर्शने झाली.
यावेळी निदर्शकांनी हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांचे फोटो हातात धरले होते. देशभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, संग्रहालये, विद्यापीठे, रेस्टॉरंट्स, कॅफे, पब आणि इतर व्यवसाय ओलिसांच्या हत्येच्या निषेधार्थ एकजुटीने बंद राहिले.
न्यायालयाकडून त्वरित संप मागे घेण्याचे आदेश…
दरम्यान देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात देशातील कामगार न्यायालयाने त्वरित सुनावणी केली आणि दुपारी अडीच वाजेपर्यंत संप मागे घेण्याची सूचना संपकर्त्या सरकारी कर्मचाऱ्यांना केली. न्यायालयाने सोमवारी आपल्या निर्णयात सरकारची बाजू घेत हा संप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले.





