Pune District : विद्यार्थ्यांनी जलजागृतीचे दूत बनावे – रवींद्र हांडे
Pune District : जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुरी येथे जलजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या अभियानानिमित्त राजुरी गावातून जलदिंडी काढण्यात आली. तसेच ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

राजुरी : पाण्याची वाढती मागणी आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जलसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांनी जलजागृतीचे दूत बनून पाणी बचतीचा संदेश आपल्या कुटुंबात आणि समाजात पोहोचवावा. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा जबाबदारीने वापर केल्यास जलसंकटाची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी केले.
जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुरी येथे जलजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या अभियानानिमित्त राजुरी गावातून जलदिंडी काढण्यात आली. तसेच ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या विषयावर वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. हांडे म्हणाले, पाणी ही निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती असून तिचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा अपव्यय टाळणे, गळती रोखणे आणि पाणी बचतीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः पाणी बचतीचे आचरण करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता विकास मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब औटी होते.
या वेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विनायक पंधे, जनता विकास मंडळाचे उपाध्यक्ष समीर औटी, विश्वस्त गौरव घंगाळे, गेणभाऊ हाडवळे आदी उपस्थित होते. प्राचार्य सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. राहिंज सर यांनी सूत्रसंचालन केले, तर डी. एन. नायकवाडी यांनी आभार मानले.
पाण्याचा योग्य वापर, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता, गळती रोखणे आणि काटकसरीने पाणी वापरणे यांसोबतच प्रशासनात पारदर्शकता असणेही महत्त्वाचे आहे. धोरणांमध्ये निश्चितता आणि प्रभावी अंमलबजावणी नसेल, तर जलसंकटावर अपेक्षित परिणामकारक उपाययोजना होऊ शकणार नाहीत.
-बाळासाहेब औटी, अध्यक्ष जनता विकास मंडळ





