Pune District : खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने सोडण्याचे आदेश
Pune District : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे मानले जात आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली असून, खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने व नियमित स्वरूपात तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे मानले जात आहे.
इंदापूर तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील अनेक गावांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रदीप गारटकर यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात तालुक्यातील शेती क्षेत्राचा विस्तार, पाण्याची वाढती गरज, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पाणी वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत न्याय्य पद्धतीने पाणी पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली. गारटकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. खडकवासला कालव्याचे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण क्षमतेने सोडून ते इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
या निर्णयामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंचनासाठी आवश्यक पाणी वेळेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असून, तालुक्याच्या सिंचनविषयक प्रश्नांबाबत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रदीप गारटकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : Khalapur : जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी अडचणीत





