Pune District : हुमणी अळी नियंत्रणासाठी बांधावर मार्गदर्शन
यावेळी माजी सरपंच हिरामण मलघे, प्रगतशील शेतकरी दिनकर काळे, मल्हारी काळे, संतोष मलघे, किरण गाडे, महेश गाडे, दत्तात्रय काळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

दावडी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचविणार्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे खरपुडी खुर्द येथे शेतकर्यांसाठी बांधावर जाऊन मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपकृषी अधिकारी शरद इंदोरे यांनी हुमणी अळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात कृषीकन्या साक्षी साठे, वैष्णवी भपाट, ऋतुजा निगडे, साक्षी शेगडे, अनुजाई बालाजी आणि जागृती भारासमुद्रे यांनी विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश किर्वे यांनी केले. यावेळी माजी सरपंच हिरामण मलघे, प्रगतशील शेतकरी दिनकर काळे, मल्हारी काळे, संतोष मलघे, किरण गाडे, महेश गाडे, दत्तात्रय काळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
हुमणी अळी नियंत्रणासाठी यांत्रिक, जैविक आणि रासायनिक उपाययोजनांचा समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पावसाळ्यात पहिल्या पावसानंतर झाडांवर बसणारे भुंगे गोळा करून नष्ट करणे, शेताच्या बांधावर प्रकाश सापळे उभारणे, मेटारायझियम अॅनिसोप्ली या जैविक बुरशीचा वापर करणे तसेच निंबोळी पेंडचा खतामध्ये समावेश करणे यासारख्या उपाययोजना प्रभावी ठरतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच खोल नांगरणी करून जमिनीतील कोष उघडे पाडल्यास पक्ष्यांमार्फत त्यांचा नाश होण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच फवारणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
हेही वाचा : Pune District : खेडमधील 31 शाळा होणार मॉडेल स्कूल





