Pune District : खेडमधील 31 शाळा होणार मॉडेल स्कूल
Pune District : त्यानंतर तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया आणि विकासकामांना गती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, कामांच्या प्रत्येक टप्प्याचे जिओटॅग फोटो ‘आयपास’ प्रणालीवर अपलोड करण्यात येणार असून कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे.

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासाला मोठी चालना देणार्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात तालुक्यातील तब्बल 31 शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून सन 2026-27 मध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून शाळांच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि आधुनिक भौतिक सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण 504 शाळांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये खेड तालुक्यातील 31 शाळांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत शाळांची सविस्तर पाहणी करून आवश्यक असलेल्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डिजिटल सुविधा, संरक्षण भिंती, पिण्याचे पाणी, क्रीडांगण तसेच इतर भौतिक सुविधांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बांधकाम विभागातील अधिकारी, उपअभियंते व शाखा अभियंत्यांना निवड झालेल्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून 15 जूनपर्यंत सविस्तर अंदाजपत्रके व विकास आराखडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानंतर तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया आणि विकासकामांना गती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, कामांच्या प्रत्येक टप्प्याचे जिओटॅग फोटो ‘आयपास’ प्रणालीवर अपलोड करण्यात येणार असून कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे.
या शाळांचा समावेश
खेड तालुक्यातील रौंधळवाडी, करंजविहीरे, थोपटेवाडी, वाहगाव-चिंचोशी, रोहकल, आंबोली, बुट्टेवाडी, गोसासी, पवळेवाडी, टेमगिरवाडी, किवळे, कोये, कुडे बुद्रुक, गुळाणी, होलेवाडी, चांडोली, दोंदे, डेहणे, तोरणे बुद्रुक, पिंबरी बुद्रुक, केळगाव, रासे, भोसेसह विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीस मोठी मदत होणार आहे.
मागील वर्षी काही शाळांमधील विकासकामांच्या दर्जाबाबत तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी विकासकामांवर लक्ष ठेवून निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्यावी. जिल्हा परिषद शाळा हे गावाचे ज्ञानमंदिर आहे.
-कुंडलिक कोहिनकर, सरपंच परिषद समन्वयक पुणे जिल्हानिवड झालेल्या 31 शाळांची वास्तुविशारद, उपअभियंते, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाहणी केली जाणार आहे. आवश्यक भौतिक सुविधांचा सविस्तर अहवाल 15 जूनपर्यंत वरिष्ठांकडे सादर केला जाईल.
-अमोल जंगले, गटशिक्षणाधिकारी
हेही वाचा : Satara: … तर माझा पहिला क्रमांक असेल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे प्रत्युत्तर





