Khalapur : जीवन प्राधिकरणाच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी अडचणीत
Khalapur : शेताकडे जाणारा रस्ता दोन महिन्यांपासून खोदलेलाच; पेरणीपूर्वी मार्ग मोकळा करण्याची मागणी

Khalapur : तलवली गावात जीवन प्राधिकरणाच्या नळ योजनेच्या कामामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गावाबाहेरील शेतजमिनींकडे जाणारा प्रमुख रस्ता सुमारे दोन महिन्यांपूर्वी खोदण्यात आला असून अद्याप पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे कठीण झाले असून पावसाळी हंगामाच्या तोंडावर चिंता वाढली आहे.
सध्या पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे बैलजोडी, नांगर तसेच ट्रॅक्टरसह इतर यांत्रिक शेती अवजारे शेतापर्यंत नेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतीची कामे रखडण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या समस्येबाबत तलवली ग्रामस्थांनी एकत्र येत वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन सादर केले आहे. खोदकाम केलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अथवा पाइपलाइनचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांसाठी मार्ग खुला करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असली, तरी कामाच्या संथ गतीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. रस्ता खोदून अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही संबंधित कंत्राटदाराने पुढील कामाला गती दिलेली नाही. खोदकाम केल्यानंतर कामगार किंवा यंत्रसामग्रीही त्या ठिकाणी दिसत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जीवन प्राधिकरणाची ही योजना २०२३-२४ या कालावधीत मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्ष कामाला २०२६ मध्ये सुरुवात झाली. आता पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता बंद झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
‘पावसाळा जवळ आल्याने शेतीसाठी लागणारी यांत्रिक अवजारे तसेच बैलजोडी शेतापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत संबंधित कंत्राटदाराला दोन दिवसांत खोदलेला रस्ता भराव करून शेतकऱ्यांसाठी मार्ग मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’ – विनोद चांदोरकर, प्रशासक
‘जीवन प्राधिकरण योजनेसाठी शेताकडे जाणारा रस्ता खोदण्यात आल्याने शेतीची यंत्रसामग्री आणि बैलजोडी शेतात नेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामांची लगबग वाढली असून वेळेत कामे न झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने खोदकाम केलेला मार्ग भरून शेतकऱ्यांसाठी रस्ता मोकळा करून द्यावा.’ – भरत मालकर, शेतकरी, तलवली
हेही वाचा:
Pune District : राष्ट्रीय पातळीवर राजगुरुनगर सहकारी बँकेची दुहेरी कामगिरी





