Online Fraud: अमेरिकी नागरिकांना ऑनलाइन संपर्क साधून ॲमेझॉन ऑर्डर, गिफ्ट व्हाउचर आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवत डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. कोरेगाव येथे रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून १७ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 35 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजित घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते. Vishwajeet Kadam : दोन्ही शहराध्यक्ष कॉंग्रेसला उभारी देणार; विश्वजीत कदम यांचे प्रतिपादन मिळालेल्या माहितीनुसार ‘श्रीसाई लॉजिस्टीक्स अँन्ड कन्सल्टंस एलएलपी’ या नावाखाली फेब्रुवारी २०२६ पासून बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये लॅपटॉप, मोबाइल, अमेरिकेतील नागरिकांच्या फोन नंबरचा डाटा आणि 21 लाख रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. छाप्यात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी (कॉल सेंटर मालक), वीरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनीष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दीपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दीपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले. या टोळीतील चार महिलांचीही चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमेरिकन नागरिकांना फोन करुन तुम्ही ॲमेझॉनवरून वस्तू ऑर्डर केली आहे, असे संशयित सांगत होते. संबंधित व्यक्तीने नकार दिल्यास त्यांच्या मोबाइलवर बनावट ऑर्डर क्रमांक व संदेश पाठवून विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर ऑर्डर रद्द करण्यासाठी गिफ्ट व्हाउचर खरेदी करा, असे सांगून डॉलर स्वरूपात रक्कम उकळली जात होती. काहींना ‘डिजिटल अरेस्टची धमकीही देण्यात येत होती. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४), ६१ (१), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोरेगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचा मोठा कट पोलिसांमुळे उधळला स्थानिक गुन्हे शाखेने वेळेत माहिती गोळा करून बोगस कॉल सेंटरवर टाकलेल्या छाप्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेली मोठी सायबर फसवणूक उघडकीस आली. डिजिटल अरेस्ट, बनावट ऑर्डर आणि गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सावध राहवे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या तपासामध्ये सातारा पोलीस गरजेनुसार अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय सायबर तपास यंत्रणेची सुद्धा मदत घेणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. Pune News : ‘आयसीएआय’च्या दीक्षांत सोहळ्यात 650 स्नातकांना पदवी