Satara: पानटपर्यांमधील नशाविक्री पोलिसांच्या रडारवर
Satara नशामुक्त भारत अभियानाच्या पाश्वर्र्भूमीवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील पानटपरी चालक आणि मालकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत पानटपरी व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत पोलिसांनी व्यावसायिकांचे लक्ष वेधले.

Satara: पानटपरीच्या माध्यमातून सुरू असलेल्या नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर आता सातारा तालुका पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. सहज उपलब्ध होणार्या नशेच्या पदार्थांमुळे अल्पवयीन मुले आणि तरुण व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका वाढत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पानटपर्यांमधून प्रतिबंधित अथवा अवैध नशेच्या पदार्थांची विक्री किंवा साठवणूक करणार्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी दिला.
नशामुक्त भारत अभियानाच्या पाश्वर्र्भूमीवर सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील पानटपरी चालक आणि मालकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत पानटपरी व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत पोलिसांनी व्यावसायिकांचे लक्ष वेधले. काही ठिकाणी बंटा गोळ्या, गुटखा, सिगारेट, गांजा तसेच अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि साठवणूक होत असल्याच्या तक्रारी व बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले.
व्यवसायाच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको!
पानटपरी चालकांनी आपल्या व्यवसायाच्या मर्यादा ओळखून कायद्याचे पालन करावे. दुकानांमध्ये प्रतिबंधित पदार्थ ठेवणे, त्यांची विक्री करणे किंवा अल्पवयीन मुलांना अशा पदार्थांची उपलब्धता करून देणे हा गंभीर प्रकार आहे. अशा व्यवहारांमुळे परिसरातील शांतता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असेल, तर संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमध्ये गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे तांबे यांनी बजावले.नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणार्या घटकांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच युवकांना या प्रवृत्तीपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मुलांच्या वागणुकीतील बदलांकडे पालकांनी लक्ष द्यावे
व्यसनमुक्तीच्या मोहिमेत केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. मुलांची संगत, मित्रपरिवार, बाहेर जाण्याच्या वेळा, पैशांची वाढती मागणी आणि वागणुकीतील अचानक होणारे बदल याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत, पानटपरी चालकांनी नियमांचे पालन करावे, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांनीही परिसरातील संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी यावेळी केले.





