Pune News : सनदी लेखापाल म्हणून स्वतंत्र व्यावसायिक होण्यावर लक्ष केंद्रित करा. सरकारी, खासगी किंवा सामाजिक क्षेत्रांत काम करताना संवेदनशीलता, नैतिकता आणि माणुसकी जपून सीए पदाची प्रतिष्ठा कायम राखा, असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रदीप भार्गवा यांनी नवोदित सनदी लेखापालांना दिला. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे बाणेर येथील बंटारा भवनातील दीक्षांत सोहळ्यात डॉ. भार्गवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ६५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सीए पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी आयसीएआयचे केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय सदस्य सीए राजेश आगरवाल, सीए अभिषेक धामणे, सीए रेखा धामणकर आणि पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे आर्थिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे मोठे दायित्व सनदी लेखापालांवर असल्याचे सांगत डॉ. भार्गवा म्हणाले की, सीए म्हणून काम करताना डूईंग वेल ऐवजी डूईंग गुड अशी तुमची वाटचाल असली पाहिजे. वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाशी मैत्री करून स्वतःला अपडेट ठेवा आणि बजेट, नफा-तोटा तसेच वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळा. सीए चंद्रशेखर चितळे यांनी नाविन्याचा ध्यास, सर्वोत्कृष्टतेची आस आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ही त्रिसूत्री अंगीकारण्याचे आवाहन केले. सीए प्रणव आपटे यांनी तंत्रज्ञानाधारित जगात नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर, सीए राजेश अग्रवाल यांनी यशानंतरही नम्रता जपण्यावर आणि सीए रेखा धामणकर यांनी नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यावसायिक होण्यावर भर दिला.