Onion Market Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! येत्या १५ दिवसांत काय घडणार? व्यापाऱ्यांचा मोठा अंदाज
Onion Market Update : दक्षिण भारतासह इतर राज्यांतही कांदा बंपर; निर्यातीत घट आणि पोषक हवामानामुळे उत्पादनात वाढ झाल्याने दराचा पेच वाढला.

Onion Market Update – लाल हळीव कांद्याचा हंगाम सुरू असतानाच येत्या १५ दिवसांत गरवी कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याची आवक अधिक असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कांद्याचे घटलेले दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला.
सद्य:स्थितीत बाजारात हळवी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, त्यातच पोषक हवामानामुळे कांद्याचे उत्पादन वाढले आहे. शेतकर्यांकडे अधिक प्रमाणात कांदा शिल्लक असताना नवीन कांद्याचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. बाजारात मागणीपेक्षा कांद्याची अधिक आवक होणार आहे तसेच निर्यातही कमीच आहे.
त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमीच आहे. कदाचित कांद्याची आवक वाढल्यास दरात आणखी घट होण्याची शक्यताही पोमण यांनी वर्तविली आहे.बाजारात श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा, शिरूर आणि पुरंदर या भागातून आवक होत आहे. दक्षिण भारतातून कांद्याला मागणी असते.
मात्र पोषक हवामानामुळे दक्षिण भारतातही कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे दक्षिणेतून कांद्याला होणारी मागणी कमीच आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशातही कांद्याचे पीक चांगले आहे. त्यामुळे तेथूनही मागणी नाही. या एकूणच कारणामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता कमीच असल्याचेही रितेश पोमण यांनी सांगितले.
१५ ते २० रुपये किलो…
मार्केटयार्डातील कांदा बाजारात दररोज १०० ते १२५ ट्रकची आवक होत आहे. यामध्ये १०० ट्रक नवीन, तर २५ ट्रक जुन्या कांद्याचा समावेश आहे. घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलोला १५ ते १८ रुपये, तर नवीन कांद्याला १५ ते २० रुपये दर मिळत आहे.





