One Nation One Election: एकाचवेळी मतदानासाठी जनतेकडून मागवल्या सूचना, कुठे पाठवायची सूचना पहा-

नवी दिल्ली – एक देश एक निवडणूक तत्वानुसार देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्च-स्तरीय समितीने या प्रस्तावावर देशातील नागरीकांच्या सूचना मागवल्या आहेत. देशात एकाचवेळी निवडणुका घेता याव्यात यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय चौकटीत योग्य ते बदल करण्यासाठी सामान्य जनतेची मते जाणून घेण्यासाठी या समितीने एक नोटीस जारी केली आहे.
सूचना समितीच्या वेबसाइट onoe.gov.in वर पोस्ट केल्या जाऊ शकतात किंवा [email protected] वर ई-मेल पाठवल्या जाऊ शकतात, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीची प्राथमिक बैठक झाली; केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा, कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, १५ व्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंग, लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष सी. कश्यप, माजी दक्षता आयुक्त संजय कोठारी, ज्येष्ठ वकिल हरीश साळवे, हे सर्व जण या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित होते.
वन नेशन, वन इलेक्शन साठीच्या समितीची स्थापना २० सप्टेंबर २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे करण्यात आली. संदर्भ अटींनुसार, समितीने एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी योग्य कायदेशीर आणि प्रशासकीय चौकट तयार करण्यासाठी शिफारसी करणे आवश्यक आहे. संविधान आणि संबंधित निवडणूक कायद्यांमध्ये आवश्यक दुरुस्त्या, समान मतदार यादी तयार करणे, या सारख्या कामांविषयीही त्यांनी सूचना करणे अपेक्षित आहे. या संबंधात जनेतेने १५ जानेवारी पर्यंत सूचना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.





