प्रभात वृत्तसेवा पुणे – एक राष्ट्र, एक निवडणूक, एक पक्ष, एक भाषा ही संकल्पना देशातील विविधतेच्या गाभ्यालाच नाकारणारी आहे. अंतिम सत्य हे आपण आपल्या आतच शोधले पाहिजे. आज आपण ज्या कथा निर्माण करत आहोत, त्या उद्याच्या भारताला आकार देतील, असे मत लोकसभा खासदार आणि संसदीय परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. शशी थरूर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्तर्फे विमाननगर येथील सिंबायोसिस ईशान्य भवनमध्ये आयोजित दोन दिवसीय साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार होते. यावेळी राजदूत पवन वर्मा, फिक्की फ्लोच्या अध्यक्षा अनिता अग्रवाल, सिंबायोसिसच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, आणि सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्सच्या संचालिका डॉ. श्वेता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, डॉ. विद्या येरवडेकर लिखित २०० मोटिवेशनल मंडेज या पुस्तकाचे प्रकाशन थरूर यांच्या हस्ते झाले.थरूर म्हणाले, आजच्या विश्लेषणाच्या युगात केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे. परंतु, डेटाला एका कथानकाची आणि तथ्यांना संदर्भाची गरज असते. सत्य प्रभावीपणे सांगण्याची गरज आहे . म्हणूनच आपण शिक्षण, ग्रंथालये, भाषांतरे आणि अशा महोत्सवांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांना केवळ कोडिंगच नव्हे, तर सर्जनशीलताही शिकवली पाहिजे. कथाकथन ही चैनीची गोष्ट नसून ती एक गरज आहे. साहित्य जागतिक कल्पनांना प्रोत्साहन देते आणि आपल्या सामायिक मानवी अनुभवाला आकार देणाऱ्या विविध कथांना स्वीकारण्यास मदत करते.